ग्राहक शिक्षणाच्या माध्यमातून जागृती होणे महत्त्वाचे : जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/12/dr-rajesh.jpg)
पुणे l प्रतिनिधी
जागतिकीकरणाच्या युगात ऑनलाइन बाजारव्यवस्था विस्तारत असताना ग्राहकांना लोकशिक्षणाच्या माध्यमातून त्यांच्या हक्कांविषयी जागरूक करणे महत्वाचे आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आयोजित प्रदर्शनाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष उमेश जावळीकर, पुणे विभागाचे पुरवठा उपायुक्त त्रिगुण कुलकर्णी, राज्य ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य तुषार झेंडे पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेखा माने, तहसीलदार हनुमंत कोळेकर उपस्थित होते.
डॉ. देशमुख म्हणाले, विविध स्तरावर माहिती प्रसार करून ग्राहकापर्यंत माहिती पोहोचविल्यास कायद्याचा उद्देश पूर्ण करता येईल. ग्राहकांनी जाहिरातींना न बळी पडता वस्तू आणि सेवेची चोखंदळपणे निवड करणे गरजेचे आहे. ग्राहकांना मत व्यक्त करण्याचा, निवड करण्याचा, तक्रार आणि निवारण करण्याचा तसेच ग्राहक हक्कांविषयी जाणून घेण्याचा अधिकार आहे. या बाबत माहिती दिल्यास ग्राहकाची होणारी फसवणूक टाळता येईल. म्हणून विविध माध्यमातून ग्राहकाला या हक्कांबाबत जागरुक करण्याचे प्रयत्न सर्वांनी करावे असे आवाहन त्यांनी केले.
पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष उमेश जावळीकर यांनी ‘ग्राहकांसमोरील आव्हाने’ या विषयावर मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ग्राहक कल्याणाची मूळ संकल्पना लक्षात घेऊन संवेदनशीलतेने काम करणे आणि त्याचबरोबर ग्राहक संहितेची माहिती प्रत्येकाला असणे गरजेचे आहे. जागरूक ग्राहक म्हणून नागरिकांना त्याच्या वर्तणुकीविषयी जाणीव करून देण्यासाठी यंत्रणा निर्माण करावी लागेल, तर दुसऱ्या बाजूस ग्राहकांचे संघटनही महत्वाचे आहे. शासकीय अधिकाऱ्यांनी ग्राहक शिक्षणाची यंत्रणा म्हणून काम करावे आणि या दिशेने होणाऱ्या प्रयत्नांचा ग्राहक दिनाच्या निमित्ताने मागोवा घेण्यात यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
पुणे विभागाचे पुरवठा उपायुक्त त्रिगुण कुलकर्णी म्हणाले, कोविड काळात विभागातील 2 कोटी ग्राहकांना सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे 1 लाख 80 हजार टन धान्य वितरण करण्यात आले. 9 हजार 200 दुकाने रंगविण्यासोबत सीसीटीव्ही, प्रथमोपचार पेटी, अग्निशमन सिलेंडर आदी व्यवस्था येत्या शिवजयंती पर्यंत होणार आहे. ग्राहकांनी तक्रार कुठे करावी याबाबतची माहिती प्रदर्शित करण्यात येत आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
राज्य ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य तुषार झेंडे यांनी देखील विचार व्यक्त केले. त्यांनी ग्राहक संरक्षण कायद्याची सविस्तर माहिती दिली. ग्राहक संरक्षण कायद्यानुसार फसवणूक करणाऱ्या जाहिराती विरोधात ग्राहकांनी तक्रार केल्यास आणि त्यात तथ्य आढळल्यास जाहिरात करणाऱ्यापासून किरकोळ विक्रेत्यापर्यंत सर्वाना जबाबदार धरले जाते, अशी माहिती त्यांनी दिली.
अन्न सुरक्षा अधिकारी राहुल खंडागळे यांनी अन्न व भेसळ प्रतिबंधक कायद्याबाबत माहिती दिली. ग्राहकांनी खाद्यपदार्थ घेताना आवेष्टनावर दिलेली माहिती नीटपणे वाचावी आणि परवाना असलेल्या विक्रेत्याकडूनच पदार्थ खरेदी करावा असे आवाहन त्यांनी केले.
प्रास्ताविकात श्रीमती माने यांनी कार्यक्रमाविषयी माहिती दिली. ग्राहकांची होणारी फसवणूक व त्याच्या हक्कांविषयी माहिती देण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ग्राहक परिषदेचे विलास लेले यांनी यावेळी विचार व्यक्त केले.
ग्राहक जागृती प्रदर्शनाचे उदघाटन
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित ग्राहक जागृती प्रदर्शनाचे उदघाटन जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. प्रदर्शनात अन्न व औषध प्रशासन, आरोग्य विभाग, प्रादेशिक परिवहन कार्यालय, राज्य परिवहन महामंडळ, एचपी गॅस, बीएसएनएल, वैध मापन शास्त्र, कृषी, अन्न व नागरी पुरवठा आदी विविध विभागांनी ग्राहक जागृतीचे संदेश प्रदर्शित केले होते. पथनाट्याच्या माध्यमातून ग्राहक जागृतीचे संदेशही यावेळी देण्यात आले.