कमी जेवण हा नव्हे तर कमी वेळा जेवण हा उपाय – डॉ.जगन्नाथ दीक्षित
![The solution is not to eat less but to eat less often - Dr. Jagannath Dixit](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/12/pjimage-2021-12-22T210244.518.jpg)
पिंपरी-चिंचवड | जेवण कमी करणे हा नव्हे तर, कमी वेळा जेवण हा खरा उपाय आहे. असा सल्ला आहारतज्ज्ञ डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी दिला.श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवात आज दुसऱ्या दिवशी आहारतज्ज्ञ डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी दोन वेळा जेवण्याचे महत्त्व विशद करत त्या जीवनशैली बाबत विस्तृत माहिती दिली.यावेळी चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव, विश्वस्त विश्राम देव, हभप आनंद तांबे, ॲड. राजेंद्र उमाप, विनोद पवार, महेश पाटसकर, अतुल भंडारे, डॉ. वेदा नलावडे, डॉ. संतोष डुमने, डॉ. विवेक कुलकर्णी, निलेश पवार व इतर मान्यवर उपस्थित होते.
डॉ. जगन्नाथ दीक्षित म्हणाले, ‘आहाराबाबत वेदांमध्ये काही गोष्टी सांगितल्या आहेत. दिवसातून एकदा जेवण करणारे योगी असतात, दोन वेळा जेवणारे भोगी आणि तीनवेळा जेवणारे रोगी असतात. सहा लाख वर्षे आपण जंगलात राहिलो असल्याने आपल्यावर प्राण्यांचे संस्कार झाले आहेत.आपला जन्म उपाशी राहण्यासाठी झाला आहे असे शास्त्रज्ञ मॅटसन सांगतो तसेच दोन वेळा जेवल्याने पुण्य मिळेल असे गौतम बुद्धांनी सांगितले आहे. दिवसांतून दोन वेळा जेवण करावे आणि यालाच आपली जीवनशैली करावी यामुळे अनेक समस्यांचे निराकरण होईल.’‘कायम खात राहिल्याने रक्तातील इन्सुलिन (संप्रेरक) खाली येत नाही, याची आपल्या पेशींना सवय नसते. त्यामुळे त्यांचा आकार वाढतो व त्यांना ग्लुकोज मिळत नाही. शास्त्र असं सांगत की इन्सुलिन वाढलं की वजन वाढतं आणि वजन वाढलं की मधुमेह होतो. दोन वेळा जेवल्याने वजन, पोट, साखर आणि इन्सुलिन या चार गोष्टी कमी होतात. दोन वेळेस 55 मिनिटांत आपला आहार घ्यायचा. यावेळेत खायला बंधन नाही. जेवण कमी करणे हा नव्हे तर, कमी वेळा जेवण हा खरा उपाय आहे.’ असा सल्ला डॉ. दीक्षित यांनी यावेळी दिला.
अनेकजण वेगवेगळे सल्ले देतात मग कोणता खरा कोणता खोटा असा प्रश्न पडतो. मग कोणती जीवनशैली अंगिकारली पाहिजे तर, अनुभवातून जे निष्पन्न होईल त्याला आपली जीवनशैली करावी असे डॉ. दीक्षित म्हणाले. आपल्याला जी शैली आयुष्याचा भाग करु वाटते त्याचे तीन महिने अनुकरण करावे. त्यातून जो निष्कर्ष निघेल त्याला आयुष्याचा भाग करावे, असा सल्ला त्यांनी दिला. चहा सुटत नसेल तर आठ दिवस विना साखरेच्या चहा प्रयोग करुन पहा त्यानंतर ती बदलेल, असेही डॉ. दीक्षित म्हणाले.
मधुमेह नसणा-या लोकांनी जेवणाच्या सुरुवातीला गोड आहाराचे सेवन करावे त्यामुळे पचन चांगले होते. त्यानंतर सॅलड (काकडी, गाजर, मुळा इ.), त्यानंतर मोड आलेले कडधान्य खावीत. हे खाल्ल्यानंतर जेवढी भूक शिल्लक आहे तेवढं खावं तसेच गरज भासल्यास दुध घेतले तरी हरकत नाही, असे डॉ. दीक्षित म्हणाले.
मधुमेह नसणा-या लोकांना गोड पदार्थांची परवानगी नाही. सुरवातीला तीन महिने फळं खाऊ नयेत. अशा लोकांना जेवणाच्या सुरुवातीला चार बदाम, चार आक्रोड आणि एक मूठ शेंगदाणे खावेत (अंजीर, मनुके वगळून). त्यानंतर सॅलड (गाजर, बिट वगळून) एक वाटी खावे, त्यानंतर कडधान्य आणि शेवटी भूक असल्यास घरातील जेवण करावे, असे डॉ. दीक्षित म्हणाले.
व्याख्यानानंतर प्रश्न उत्तरे घेण्यात आली. यावेळी अनेकांना आपली प्रश्न उपस्थित केले त्याला डॉ. दीक्षित यांनी समाधानकारक उत्तरे दिली तसेच अनेकांना आपले अनुभव सांगितले.
कार्यक्रमाच्या शेवटी आहारतज्ज्ञ डॉ. जगन्नाथ दीक्षित यांच्यासह डॉ. वेदा नलावडे, डॉ. संतोष डुमने, डॉ. विवेक कुलकर्णी, निलेश पवार यांचा मंदार महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विश्वस्त विश्राम देव यांनी आभार मानले.