टीईटी पेपरफुटी प्रकरणी आणखी दोघांना अटक; राज्य शिक्षण परिषदेच्या माजी अध्यक्षांचाही समावेश
![#TETExamScam: शिक्षक पात्रता परीक्षेत मोठा घोटाळा; ७ हजार ८०० अपात्र उमेदवार पैसे देऊन झाले पास](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/tet.jpg)
मुंबई |
शिक्षक पात्रता परीक्षेतील (टीईटी) गैरव्यवहारप्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक केल्यानंतर आणखी एका मोठ्या अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली आहे. टीईडी पेपरफुटी प्रकरणी महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे माजी अध्यक्ष, उच्च आणि माध्यमिक औरंगाबाद विभागीय माजी अध्यक्ष सुखरेदव ढेरे यांना अटक करण्यात आली आहे. तसेच बंगळुरुमधून जीए टेक्नॉलॉजीच्या प्रमुखालाही पुणे पोलिसांनी अटक केली आहे. .या कारवाईमुळे आणखी मोठ्या अधिकाऱ्यांची नावे समोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सुखरेदव ढेरे यांना संगमनेर येथून पुणे पोलिसांनी अटक केली आहे. तर बंगळुरू येथून जीए टेक्नॉलॉजीचे प्रमुख अश्विनकुमार यांनाही अटक करण्यात आली आहे. शिक्षक पात्रता परीक्षेतील (टीईटी) गैरव्यवहारप्रकरणी पुणे पोलिसांच्या सायबर विभागाने ही कारवाई केली आहे. या प्रकरणामध्ये आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
२०१७ पासून जीए टेक्नॉलॉजीला परीक्षांसंदर्भात कंत्राट दिल्यानंतर शिक्षण परिषदेमध्ये गैरव्यवहार सुरु असल्याची माहिती पुणे पोलिसांच्या हाती लागली आहे. त्यामुळे २०१७ पासून भरती झालेले उमेदार संशयाखाली आले आहेत. सोमवारी टीईटी गैरव्यवहारप्रकरणी अटकेत असलेले महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांची मुलगी आणि जावयाच्या मित्राच्या घरी सोमवारी घातलेल्या छाप्यात एक कोटी ५८ लाखांची रोकड तसेच दागिने असा ऐवज जप्त करण्यात आला.
गैरव्यवहार प्रकरणात सुपे तसेच तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर यांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना २३ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सुपे यांच्या अटकेनंतर सुरुवातीला त्यांच्या घरातून ८८ लाखांची रोकड जप्त करण्यात आली होती. या प्रकरणात पुणे सायबर गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी संजय शाहूराव सानप या आणखी एकास बीड जिल्ह्यातील वडझरी-पाटोदा येथून अटक केली. दरम्यान, सुपे यांच्या घरातून सुरुवातीला ८८ लाख ४९ हजारांची रोकड, पाच ग्रॅम सोन्याचे नाणे, पाच तोळे दागिने तसेच पाच लाख ५० हजार रुपयांच्या मुदत ठेवीच्या पावत्या जप्त करण्यात आल्या होत्या. शिक्षक पात्रता परीक्षेतील गैरव्यवहारात सुपे यांनी मोठ्या प्रमाणावर बेकायदा संपत्ती जमवल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.
- सुपे निलंबित…
सुपे यांना अटकेच्या दिनांकापासून निलंबित करण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली. हा आदेश अमलात असेपर्यंत आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे हे सुपे यांचे मुख्यालय राहील आणि त्यांना पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही. निलंबनावस्थेत त्यांना खासगी नोकरी किंवा व्यवसाय करता येणार नाही.