‘विजय दिवस’च्या कार्यक्रमात इंदिरा गांधी यांच्या नावाचा उल्लेखही केंद्र सरकारने न केल्याबद्दल प्रियांका गांधी संतापल्या, म्हणाल्या मोदी तुम्ही…
![‘विजय दिवस’च्या कार्यक्रमात इंदिरा गांधी यांच्या नावाचा उल्लेखही केंद्र सरकारने न केल्याबद्दल प्रियांका गांधी संतापल्या, म्हणाल्या मोदी तुम्ही…](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/12/Priyanka-Gandhi-4-2.jpg)
नवी दिल्ली |
१९७१ च्या भारत पाकिस्तान युद्धात भारताने अल्पावधितच विजय मिळवला होता. जगाच्या नकाशात बांगलादेश या नव्या देशाची निर्मिती केली होती. या युद्धात तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशाचे सक्षम नेतृत्व केले होते. या विजयाला ५० वर्ष पुर्ण झाल्याच्या निमित्ताने २०२१ हे वर्ष ‘सुवर्ण विजय वर्ष’ तर १६ डिसेंबर हा ‘सुवर्ण विजय दिवस’ म्हणून केंद्र सरकार साजरं करत आहे. यानिमित्ताने केंद्र सरकारसह देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केलं जात आहे. मात्र केंद्र सरकारने आयोजित केलेल्या प्रमुख कार्यक्रमात सरकारने खास करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुठेही इंदिरा गांधी यांचा उल्लेखही न केल्याबद्दल काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
“देशाच्या पहिल्या आणि एकमेव पंतप्रधान राहिलेल्या इंदिरा गांधी यांचे नाव भाजप सरकारकडून विजय दिवस निमित्त आयोजित कार्यक्रमात वगळण्यात आलेलं आहे. हा ५० वा वर्धानपनदिन आहे ज्या दिवशी त्यांनी भारताला विजय मिळवून दिला आणि बांगलादेशला मुक्त केले. तुम्ही याकडे दुर्लक्ष करत आहात. देशभक्तीकडे बघण्याचा तुमचा दृष्टीकोन योग्य नाही. महिलांना त्याचे श्रेय देण्याची गरज आहे ” अशा भावना प्रियांका गांधी यांनी ट्विट करत व्यक केल्या आहेत.
Our first and only woman Prime Minister, Indira Gandhi is being left out of the misogynist BJP government’s Vijay Diwas celebrations. This, on the 50th anniversary of the day that she led India to victory and liberated Bangladesh…1/2 pic.twitter.com/Ymlm57Ji7e
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) December 16, 2021
दरम्यान या ट्वीटमध्ये चार फोटो प्रियांका यांनी शेयर केले आहेत. जखमी झालेल्या सैनिकाशी बोलतांना, प्रत्यक्ष युद्धभुमी जवळच्या ठिकाणी, सैन्य दलाच्या सेनापतींशी हस्तालोंदन करताना आणि शेख मुजीबुर रेहमान यांच्या सोबतचे पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे छायाचित्र प्रियांका गांधी यांनी शेयर केले आहे. दरम्यान उत्तराखंड इथे काँग्रेस पक्षाच्या एका सभेत काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनीही केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. ज्या महिलेनं देशासाठी ३२ गोळ्या झेलल्या, तिचं नाव कार्यक्रम पत्रिकेवर, आमंत्रण पत्रिकेवर नव्हतं. कारण या सरकारला सत्याची भिती वाटते असं राहुल गांधी म्हणाले.