‘आयएमएफ’च्या दुसरे सर्वोच्च अधिकारपदी गीता गोपीनाथ; जानेवारीत स्वीकारणार पदभार
![Geeta Gopinath as the second highest authority of the IMF; Assuming office in January](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/12/images-62.jpeg)
वॉशिंग्टन – आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या दुसरे सर्वोच्च अधिकाराचे पद असलेल्या पहिल्या उपव्यवस्थापकिय संचालक म्हणून गीता गोपीनाथ यांची नियुक्ती झाली आहे. पुढील वर्षी ‘आयएमएफ’चे उपव्यवस्थापकीय संचालक जेफ्री ओकामोटो हे पायउतार होतील व त्या जागी गोपीनाथ या २१ जानेवारीपासून या पदाची सूत्रे स्वीकारतील.
‘आयएमएफ’मधील कार्यकाळ संपल्यानंतर पुन्हा हार्वर्ड विद्यापीठात अध्यापन कार्यात परतण्याचा गोपीनाथ यांनी निर्णय घेतला होता. जानेवारी २०१९ मध्ये तीन वर्षे मुदतीसाठी मुख्य अर्थतज्ज्ञ म्हणून ‘आयएमएफ’च्या सेवेत दाखल झाल्या होत्या. जेफ्री आणि गीता दोघेही उत्तम सहकारी आहेत. जेफ्रीला जाताना पाहून मला वाईट वाटते आहे, पण त्याच वेळी, गीताने उपव्यवस्थापकीय संचालकपदाची नवीन जबाबदारी स्वीकारण्याचा निर्णय घेतल्याचा मला आनंद आहे, असे आयएमएफच्या व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टलिना जॉर्जिएव्हा यांनी या नियुक्तीबद्दल प्रतिक्रिया दिली.