महापालिकेच्या स्पर्धा परीक्षा केंद्रातून 18 विद्यार्थी अधिकारी
पिंपरी – महापालिकेच्या वतीने शहरात होतकरु विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करता यावा, याकरिता विविध ठिकाणी स्पर्धा परीक्षा केंद्राची सोय करण्यात आली. त्या केंद्राच्या माध्यमातून पिंपरी चिंचवडच्या तब्बल 18 विद्यार्थी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक, विक्रीकर अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी या पदाच्या परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. या विद्यार्थ्यांच्या यशामुळे निश्चित पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नावलाैकीकात भर पडली असून विद्यार्थ्यानी अतिशय काैतुकास्पद कामगिरी केली आहे, असे मत महापाैर नितीन काळजे यांनी व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड महापालिकेत आज (बुधवार) महापौरात दालनात महापालिकेच्या स्पर्धा परिक्षा अभ्यासिकेत अभ्यास करुन विविध परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार सभारंभाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपमहापौर शैलजा मोरे, पक्षनेता एकनाथ पवार, विरोधी पक्षनेता दत्तात्रय साने, ग प्रभाग अध्यक्ष बाबासाहेब त्रिभुवन, ह प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे, नगरसदस्य सुरेश भोईर, राजू मिसाळ, श्याम लांडे, नगरसदस्या अश्विनी चिंचवडे, संगिता ताम्हाणे आदी मान्यवर उपस्थित होते.
महापालिका स्पर्धा परिक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये वैभव सूर्यवंशी, रंजीत मगर, मनोज शिंदे, समाधान महानवर, सागर पानसरे, विनय माने, किरण मुंडे, वसंत ठाकरे, ममता वर, प्रविण साने, पायल परदेशी, सोनाली मोरे, सागर देवकर, लक्ष्मण मोगले, अंकिता पवार, श्रीराम पवार यांचा समावेश आहे. त्या सर्व विद्यार्थ्याचा महापाैर नितीन काळजे याचे हस्ते पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले, आपण केवळ एमपीएससी या परिक्षेत उत्तीर्ण झाल्याचे समाधान न मानता यापुढे युपीएससी परिक्षेकडे वाटचाल करुन मोठया पदावर काम करावे, याकरिता प्रत्येक विद्यार्थ्याने अपार कष्ट घेवून आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न पुर्ण करावे, असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाग्यश्री देशमुख यांनी केले. तर नगरसदस्य सुरेश भोईर यांनी आभार मानले.