कॅनडातून आणलेल्या अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीची १५ नोव्हेंबरला प्रतिष्ठापना
नवी दिल्ली – कॅनडाच्या ओटावा येथून भारतात परत आणलेल्या अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना उत्तर प्रदेशातील वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिरात १५ नोव्हेंबरला केली जाईल, अशी माहिती केंद्रीय पर्यटन व संस्कृती मंत्री जी. किशन रेड्डी यांनी दिली.
केंद्र सरकारच्या पर्यटन व संस्कृती मंत्रालयाने १९७६ पासून आतापर्यंत परदेशी नेलेल्या ५५ मूर्ती आतापर्यंत भारतात परत आणल्या आहेत. त्यापैकी ४२ मूर्ती २०१४ नंतर भारतात परत आणल्या आहेत. कॅनडाच्या ओटावा येथून अलिकडेच अन्नपूर्णा देवीची मूर्ती आणली आहे. ११ नोव्हेंबरला ही मूर्ती दिल्लीतून अलिगडला नेली जाईल. तिथून १२ नोव्हेंबरला ती कन्नौजला नेली जाणार आहे. त्यानंतर १४ नोव्हेंबरला ती आयोध्येला पोहोचेल. नंतर १५ नोव्हेंबरला वाराणसीला जाईल. तिथे काशी विश्वनाथ मंदिरात विधिवत पूजा करून तिची प्रतिष्ठापना केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.