वाढत्या इंधनदरांमुळे सर्वसामान्य चिंतेत असतानाच गडकरींचा महत्त्वाचा निर्णय; तीन महिन्यात होणार आदेश जारी
![Gadkari's important decision while the general public is worried about rising fuel prices; The order will be issued in three months](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/10/gadkari.jpg)
नवी दिल्ली |
वाढत्या इंधनदरांमुळे सर्वसामान्य चिंतेत असतानाच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलासा देणारा एक निर्णय घेतला आहे. येत्या सहा महिन्यात देशातील वाहनांमध्ये फ्लेक्स-फ्युएल इंजिन अनिवार्य केलं जाण्याची शक्यता आहे. नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली असून वाहन उत्पाकदांना फ्लेक्स-फ्युएल इंजिन तयार करण्यात सांगणार असल्याचं म्हटलं आहे. फ्लेक्स-फ्युएल इंजिन हे इथेनॉल, सीएनजी आणि बायो सीएनजी या पर्यायांवर चालणारं असेल. एका कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी यांनी पुढील १५ वर्षात भारतीय वाहन उद्योगाचं मूल्य १५ लाख कोटी इतकं असेल असं म्हटलं.
“फ्लेक्स फ्युएल इंजिनाच्या निर्मितीची परवानगी देण्यासाठी आम्ही सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचा विचार करत होतो. पण आता सर्व वाहन उत्पादकांनाच पुढील सहा ते आठ महिन्यात फ्लेक्स फ्युएल इंजिन (जे एकापेक्षा जास्त इंधनावर चालते) तयार करण्यासाठी सांगितलं पाहिजे असं वाटत आहे,” असं गडकरी म्हणाले आहेत. सर्व वाहन उत्पादकांना फ्लेक्स फ्युएल इंजिन अनिवार्य केलं जाईल असं सांगताना नितीन गडकरी यांनी यामुळे वाहनांच्या किंमती वाढणार नाहीत असा दावा केला आहे. तसंच येणाऱ्या काही दिवसांत भारत ग्रीन हायड्रोजनची निर्यात करेल असंही ते म्हणाले आहेत.