अकोल्यात धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद
![A leopard in Akola has finally been arrested](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/10/Leopard-1.jpg)
अकोले – तालुक्यातील वारंघुशी गावात मागील काही दिवसांपासून बिबट्याने प्रचंड धुमाकूळ घातला होता. सतत गुरांवर हल्ला करून त्यांच्यावर ताव मारत होता. बिबट्याच्या वावरामुळे नागरिकही अतिशय दहशतीत राहत होते. त्यामुळे या बिबट्याला लवकरात लवकर जेरबंद करण्याची मागणी जोर धरू लागली होती. अखेर शनिवारी मध्यरात्री त्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. आता या बिबट्यास संगमनेर येथील निंबाळेमधील वनविभागाच्या रोपवाटिकेत हलवण्यात आले आहे.
वारंघुशी गावातील सामाजिक कार्यकर्त्यांकडून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी सातत्याने वनविभागाकडे पाठपुरावा करण्यात येत होता. त्यानंतर अखेर तीन दिवसांपूर्वी वारंघुशी गावाबाहेर हल्लेखोर बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला. यावेळी पिंजऱ्यात त्याला आमिष म्हणून एक कुत्रे ठेवण्यात आले होते. शेवटी शनिवारी मध्यरात्री बिबट्या या पिंजऱ्यात अडकला आणि सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. त्यानंतर जेरबंद झालेल्या बिबट्याला पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.