आर्यन खानला दिलासा नाही! न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला
![Aryan Khan is not relieved! The court rejected the bail application](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/10/aryan-khan-4.jpeg)
मुंबई – क्रूझ रेव्ह ड्रग्ज पार्टी प्रकरणात मुंबई न्यायालयाने अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळला आहे. न्यायालयाच्या या निकालानंतर आर्यन खानसह मूनमून धमेचा आणि अरबाज मर्चंटचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे. दरम्यान, या निकालाविरोधात सत्र न्यायालयात जाणार असल्याचं आरोपींच्या वकिलांनी म्हटलं आहे.
मुंबईवरुन गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर सुरु असलेल्या रेव्ह पार्टीमध्ये आर्यन खानसह इतर सात जणांना अटक करण्यात आले होते. या प्रकरणाचा तपास सध्या एनसीबीकडून सुरु आहे. एनसीबीने आर्यन खानसह अरबाझ मर्चंट (आर्यनचा मित्र), मूनमून धमेचा, नुपूर सारिका, इस्मित सिंग, मोहक जैस्वाल, विक्रांत चोकेर, गोमित चोप्रा यांना अटक केलं होतं. आज आर्यन खान तसेच त्याच्यासोबत अटक करण्यात आलेल्या इतर सात जणांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी घेण्यात आली. जामीन अर्जावर तब्बल अडीच तास युक्तिवाद चालला. यावेळी न्यायालयाने आर्यन खानसह अरबाज मर्चंट तसेच मूनमून धमेचा याचा जामीन अर्ज फेटाळला. न्यायालयाच्या या निकालामुळे आता आर्यन खानला तुरुंगातच मुक्काम ठोकावा लागणार आहे.