भोसरी कपड्यांच्या दुकानाला आग; 25 लाखांचे कपडे जळून खाक
![Fire at Bhosari clothing shop; Burn 25 lakh clothes](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/10/IMG-20211006-WA0000.jpg)
पिंपरी – भोसरी येथे कपड्यांच्या दुकानाला आग लागली. यामध्ये सुमारे 20 ते 25 लाख रुपयांचे कपडे जळून खाक झाल्याची माहिती मिळाली आहे. ही घटना मंगळवारी (दि. 5) रात्री सव्वा दहा वाजताच्या सुमारास आळंदी रोड, भोसरी येथे घडली.
अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आळंदी रोड भोसरी येथे जयराम येणारे यांचे आर जे फॅशन नावाचे कपड्यांचे दुकान आहे. मंगळवारी रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास या दुकानाला आग लागली. त्यानंतर नागरिकांनी प्रत्यक्ष भोसरी अग्निशमन उपकेंद्रात जाऊन घटनेची माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच भोसरी आणि चिखली अग्निशमन उपकेंद्राचे प्रत्येकी एक आणि पिंपरी चिंचवड अग्निशमन मुख्य केंद्राचे तीन असे एकूण पाच बंब घटनास्थळी दाखल झाले. पाऊण तासात आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन विभागाच्या जवानांना यश आले. या घटनेत दुकानातील सुमारे 20 ते 25 लाख रुपयांचे कपडे जळाले असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी अग्निशमन विभागाला दिली आहे. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.