राज्यातील मान्सूनचा परतीचा प्रवास १२ ऑक्टोबरपासून सुरू होणार
![Rain forecast with thunderstorms for the next two-three days in some parts of the state](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/04/iStock-547033564.jpg)
पुणे – यंदाचा मान्सून हंगाम काल ३० सप्टेंबर रोजी संपला असला तरी देशातील मान्सून परतीचा प्रवास पूर्व राजस्थानातून येत्या ६ ऑक्टोबरपासून सुरू होईल. तर महाराष्ट्रातून तो परतीच्या वाटेला निघण्यास १२ ऑक्टोबर उजाडणार आहे. दरम्यान, शाहीन चक्रीवादळ पाकिस्तानच्या दिशेने निघाले असल्याने आता राज्यात अतिवृष्टीची शक्यता मावळली आहे. तसेच यंदा संपूर्ण राज्यात सरासरीपेक्षा १९ टक्के पाऊस जास्त पडला आहे.
यंदा मान्सून खंडित झाल्याने परतीचा प्रवास महिनाभराने लांबला आहे. दरवर्षी मान्सून १७ सप्टेंबरच्या सुमारास निघतो. मात्र यंदा ६ ऑक्टोबरपासून तो परतीच्या प्रवासासाठी निघणार आहे. जुलै-ऑगस्टमध्ये पावसाने ओढ दिली. मात्र सप्टेंबरमध्ये त्याने ती कसर भरून काढली. संपूर्ण राज्यात सरासरीपेक्षा १९ टक्के पाऊस जास्त झाला आहे. मराठवाड्यात तर ६८ टक्के पाऊस जास्त झाल्याने त्या भागात ओल्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. शाहीन चक्रीवादळाचा प्रवास काल पाकिस्तान मरकतच्या दिशेने सुरू झाल्याने त्याचा परिणाम फक्त तळकोकणापुरता राहील, मात्र राज्यात जी अतिवृष्टीची शक्यता वर्तविली होती ती आता मावळली असल्याचे हवामान विभागाच्या शास्त्रज्ञांनी सांगितले. यंदा मराठवाड्यात सप्टेंबरमध्ये जो पाऊस पडला ती ढगफुटी हेती का, या प्रश्नावर दिल्लीतील हवामान शास्त्र विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा म्हणाले, ढगफुटी होती की नाही हे सांगणे कठीण आहे मात्र मराठवाड्यावर कमी दाबाचा पट्टा असल्याने जास्त पाऊस झाला. शाहीन चक्रीवादळ भारतीय किनारपट्टीपासून लांब गेल्याने अतिवृष्टी होणार नाही. मात्र १ ते ४ ऑक्टोबर या कालावधित कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र व विदर्भातील काही भागात मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल, असा अंदाज हवामान शास्त्र विभागाने वर्तविला आहे.
टॅग्स :