दुबईला फिरायला नेण्याच्या अमिषाने 14 वर्षीय मुलीवर बलात्कार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/rape-case-ajani_.jpg)
पुणे – दुबईला फिरायला नेण्याचे अमिष दाखवून चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीवर 19 वर्षीय तरूणाने बलात्कार केल्याची घटना घडली. पीडित मुलगी गर्भवती राहिल्याने हा प्रकार उजेडात आला. या प्रकरणात वारजे माळवाडी पोलिसांनी त्याला अटक केली असून, न्यायालयाने 6 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
दशरथ शंकर राठोड (वय 19, रा. शिवणे) असे पोलीस कोठडी झालेल्याचे नाव आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने पोलिसात फिर्याद दिली आहे. ही घटना नोव्हेंबर ते डिसेंबर 2017 या कालावधीत न्यू अहिरेगाव वारजे आणि शिवणे भागात घडली. राठोड याने त्या मुलीवर प्रेमसंबंध निर्माण केले. लग्नाचे अमिष दाखवून दुबईला फिरण्यास नेतो, असे सांगून त्या मुलीवर वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या प्रकरणात पोलिसांनी दशरथ याला अटक करून न्यायालयात हजर केले. त्यावेळी अधिक तपास करण्यासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी अतिरिक्त सरकारी वकील शुभांगी देशमुख यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली.