विद्यार्थ्यांना झालेल्या त्रासाबद्दल मी माफी मागतो, पण लवकरच परीक्षा होणार – राजेश टोपे
![Health department exams will be held, possible dates announced by Rajesh Tope](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/images_1585299288869_rajesh_tope.jpg)
मुंबई – आरोग्य विभागाची परीक्षा आयत्या वेळेला रद्द करण्यात आल्याने उमेदवार चांगलेच संतापले आहेत. यावर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, आरोग्य विभागाची परीक्षा रद्द झालेली नसून पुढे ढकलण्यात आलेली आहे. जाहीर केलेल्या जागा कोणत्याही परिस्थिती भरणारच आहे.
ते पुढे म्हणाले की, कंपनीने असमर्थता दाखविल्यमुळे परीक्षा रद्द करण्याची नामुष्की ओढावली आहे. पण विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला. मी विद्यार्थ्यांची माफी मागतो. पण विद्यार्थ्यांनी काळजी करु नये. येत्या काहीच दिवसांत परीक्षेच्या तारखेची घोषणा केली जाईल.
राज्यात आज आणि उद्या (शनिवार आणि रविवार ता. 25 आणि 26 सप्टें) आरोग्य विभागाच्या गट क व गट ड पदाची परीक्षा घेतली जाणार होती. मात्र कंपनीच्या असमर्थततेमुळे परीक्षा रद्द केल्याची प्रतिक्रिया राजेश टोपे यांनी दिली. मात्र शासनाने रात्री उशिरा हा निर्णय घेतल्याने हजारो विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली. परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी कुणी प्रवास करत होतं. तर कुणी अगोदरच पोहोचलं होतं. मात्र शासनाने परीक्षेला जेमतेम 12 तास बाकी असताना हा निर्णय घेतल्याने विद्यार्थ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
कंपनीने असमर्थता दाखवली, त्यामुळे परीक्षा रद्द करण्याशिवाय पर्याय नव्हता
राजेश टोपे म्हणाले, “कंपनीने असमर्थता दाखवली, त्यामुळे परीक्षा रद्द करण्याशिवाय पर्याय नव्हता. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्याशी रात्री उशिरापर्यंत चर्चा झाल्यानंतर हा निर्णय घेतला. विद्यार्थ्यांशी झालेल्या त्रासाबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो.”
परीक्षा होणारच, जाहीर केलेल्या जागा भरणारच
पुढे बोलताना राजेश टोपे म्हणाले, “आरोग्य विभागाशी संबंधित जरी थेट हा विषय नसला तरी आयटी विभागाने दाखवलेल्या असमर्थतेमुळे ही वेळ आली. पण परीक्षा रद्द झालेली नाही, परीक्षा नियोजित पद्धतीने होणार, परीक्षा लांबणीवर पडली आहे, न्यासा कंपनीने असमर्थता दाखवली, या कंपनीने आता दहा दिवसांचा वेळ मागितला आहे, त्यामुळे ही परीक्षा होणारच आहे, ठरलेल्या जागा भरल्या जाणार आहेत”
परीक्षेतील घोळ आहे की सरकारचा घोळ आहे?, फडणवीसांची कडाडून टीका
आदल्या रात्री विद्यार्थ्यांना समजतं परीक्षा रद्द झाली, या सरकारचा घोळ काही समजत नाही, प्रवेश पत्र यूपीमधलं मिळतं, सगळंच कन्फ्युजन आहे. काही दलाल मार्केटमध्ये आलेले आहेत. या पदांसाठी त्यांच्यापासून ५ लाख, १० लाख गोळा करण्याचे प्रकार घडत आहेत, असे गंभीर आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर केले.
या संपूर्ण प्रकरणाकडे गांभीर्याने पाहावं, विद्यार्थ्यांचं नुकसान बंद करा, अन्यथा आंदोलन करु, असा इशाराही यावेळी फडणवीसांनी दिला. या प्रकरणाची १०० टक्के चौकशी व्हावी, हे दलाल कोण आहेत ते समोर आलं पाहिजेत. विद्यार्थ्यांकडे पैसे मागितले जात आहेत त्याची चौकशी व्हायलाच पाहिजे, असंही फडणवीस म्हणाले.
कोणीही घोळ केला असेल तर कारवाई झालीच पाहिजे, सरकार जबाबदारी झटकू शकत नाही, सर्वत्र घोळच घोळ सुरु आहे, या सरकारला घोळ सरकार म्हणायचं का?, असा सवाल फडणवीसांनी विचारला. हा दलालीचा नवा अध्याय सुरु झालाय, परीक्षेतील घोळ आहे की सरकारचा घोळ आहे? याची चौकशी करावी, असंही फडणवीस म्हणाले.