पश्चिम, मध्य आणि हार्बर या तिन्ही रेल्वे मार्गांवर उद्या रविवारी मेगाब्लॉक
![Megablocks on all three railway lines, West, Central and Harbor, tomorrow, Sunday](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/06/meghablock.jpg)
मुंबई – पश्चिम, मध्य आणि हार्बर या तिन्ही रेल्वे मार्गांवर उद्या रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे या तिन्ही मार्गांवरील लोकल सेवांवर त्याचा परिणाम होणार असल्याने प्रवाशांनी गरज असेल तरच प्रवासासाठी बाहेर पडावे, असे आवाहन रेल्वेने केले आहे.
पश्चिम रेल्वेवर गोरेगाव आणि सांताक्रुज दरम्यान जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ या कालावधीत अप आणि डाऊन धीम्या मार्गावर हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. परिणामी या काळात धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावरून चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून काही लोकल विलंबाने धावणार आहेत.
हार्बर रेल्वे मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी आणि वांद्रे दरम्यान सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.४० दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे सीएसएमटी ते वडाळा रोड तसेच वाशी, बेलापूर, पनवेलकडे जाणाऱ्या अप आणि डाऊन लोकलच्या सर्व फेऱ्या या वेळेत रद्द करण्यात आल्या आहेत. सीएसएमटी येथून वांद्रे, गोरेगावकडे जाणाऱ्या लोकलही बंद राहणार आहेत. या मेगाब्लॉकच्या काळात कुर्ला ते पनवेल दरम्यान विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत.
मुख्य मार्गावर दिवा ते ठाणे दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गासाठी १० तासांचा विशेष मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तो यापूर्वीच जाहीर करण्यात आला आहे. यामुळे नागरिकांनी आवश्यक आणि गरजेचे काम असेल तरच प्रवासासाठी बाहेर पडावे, असे आवाहन रेल्वेने केले आहे.