मोदी, भाजप मनमानीपणे निर्णय घेऊ शकत नाहीत – मोईली
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/veerappa-moily-.jpeg)
- लोकसभा निवडणुका मुदतीआधी घेण्याचा मुद्दा
हैदराबाद – लोकसभा निवडणुका मुदतीआधी घेण्याच्या हालचाली मोदी सरकारकडून सुरू असल्याची जोरदार चर्चा आहे. मात्र, राजकीय स्वार्थासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप त्यासंबंधीचा निर्णय मनमानीपणे घेऊ शकत नाहीत, असे माजी केंद्रीय मंत्री आणि कॉंग्रेस नेते एम.वीरप्पा मोईली यांनी म्हटले आहे.
निवडणुका मुदतीआधी घेणे हा अतिशय महत्वाचा घटनात्मक मुद्दा आहे. त्याबाबतचा निर्णय सर्व राजकीय पक्षांनी घ्यायचा आहे. चालू वर्षात मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तिसगढ आणि मिझोराम या राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. देशहिताचा नव्हे तर त्या निवडणुकांचा विचार करून लोकसभा निवडणुका मुदतीआधी घेण्याचा विचार भाजपकडून केला जात आहे. चारपैकी किमान तीन राज्यांत भाजपचा पराभव होण्याची भीती मोदींना सतावत आहे.
त्यातून लोकसभा निवडणुका मुदतीआधी घेण्याचा विषय पुढे आला आहे, असा दावा मोईली यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना केला. देशातील एका व्यक्तीची हुकूमशाही राजवट घालवण्यासाठी आणि भाजपसारख्या जातीयवादी शक्तीचा पराभव करण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.