पवना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा; धरणातून विसर्ग वाढल्यामुळे दक्षता घेण्याचे आवाहन
![Warning to the villages along the Pawana river; Appeal for vigilance due to rising discharge from the dam](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/09/pawana-pcmc.jpg)
पिंपरी । प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण शंभर टक्के भरले आहे. हवामानाच्या अंदाजानुसार धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचे प्रमाण वाढू शकते. धरणाच्या पातळीमध्येही वाढ होत आहे. पवना धरणातून १३५० क्युसेक प्रमाणे वीजनिर्मिती प्रकल्पातून विसर्ग सुरू आहे. त्यात आज रविवारी रात्री आठ वाजता २१०० क्युसेकने वाढ केली जाणार आहे. त्यामुळे एकूण ३४५० क्युसेकने विसर्ग सुरू केला जाणार आहे. त्यामुळे पवना नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पवना धरणाच्या खालील बाजूस नदी तिरावरील सर्व गावातील नागरिकांनी दक्ष राहून नदी तीरावरील त्यांचे सर्व जनावरे, मोटारी, अवजारे व इतर सामुग्री त्वरीत सुरक्षित हलविण्यात यावे. जेणे करून कुठलीही जिवित व वित्त हीनी होणार नाही याची काळजी घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे.
पवना धरणातून सुरू असलेला विसर्ग
- विद्युत जणित्राद्वारे १३५० क्युसेक
- सांडव्याद्वारे सुरू होईल २१०० क्युसेक
- एकूण ३४५९ क्युसेक
पवना नदीच्या काठावर पिंपरी चिंचवड मधील रावेत, पुनावळे, वाल्हेकरवाडी, चिंचवड, काळेवाडी, थेरगाव, पिंपरी, रहाटणी, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, कासारवाडी, फुगेवाडी, दापोडी, सांगवी ही गावे आहेत. सांगवी व दापोडी येथे पवना व मुळा नद्यांचा संगम आहे. दोन्ही नद्यांच्या संगमावर सांगवी, दापोडी व पुण्यातील बोपोडी ही गावे आहेत. पुढे बोपखेल, पुण्यातील कळस, विश्रांतवाडी, बोपोडी, खडकी बाजार, संगमवाडी परिसर आहे.