मिशन २०२२ : पिंपरी-चिंचवडच्या स्थानिक प्रश्नांवर आमदार आण्णा बनसोडे यांची सक्रियता वाढली!
![Mission 2022: MLA Anna Bansode's activism on local issues of Pimpri-Chinchwad increased!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/09/anna-bansode-pcmc.jpg)
पिंपरी । विशेष प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे एकमेव आमदार आण्णा बनसोडे यांची सक्रियता चांगलीच वाढली आहे. शहरातील विविध प्रश्नांवर निवेदने ते देत आहेत. रखडलेल्या कामांचा पाठपुरावा करत आहेत. त्यांनी क्रियाशील होण्याबद्दल अनेक जण चर्चा करत होते. मात्र सध्या त्यांची वाढती सक्रियता पाहून विरोधकांसह अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात अनेक प्रश्न रखडलेले आहेत. हे प्रश्न घेऊन आमदार बनसोडे राष्ट्रवादी काँगे्रस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना बारामती येथे भेटले. त्यांच्यापुढे शहरातील प्रश्नांचे गार्हाणे मांडले. हे प्रश्न सोडविण्याचा शब्द घेऊन ते माघारी आले. त्यामध्ये बोपखेल पुल, डेअरी फार्म, सत्ताधार्यांची चुकीची कामे आदींचा समावेश होता. या बरोबरच अमृत योजनेबाबत देखील आमदार बनसोडे यांनी आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले होते.
यासह सध्या लोकांच्या प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार बनसोडे रोज आपल्या कार्यालयात दुपारी १२ नंतर हजेरी लावत आहेत. त्या ठिकाणी प्रश्न घेऊन येणार्या नागरिकांची रिघ लागत आहे. आमदार बनसोडे यांची वाढती सक्रियता, पिंपरी मतदारसंघातील त्यांची कार्यकर्त्यांसोबत मोठी नाळ आहे. त्याला आव्हान उभे करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी कामाला लागले आहेत. मात्र त्यांच्या आव्हानाला आमदार बनसोडे किती पुरून उरतात हे पहावे लागणार आहे.
राज्यातील नेत्यांची आण्णांच्या कार्यालयाला भेटी…
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणूका तोंडावर आल्या आहेत. राज्यातील अनेक नेत्यांनी शहरात लक्ष घातले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून सध्या आमदार आण्णा बनसोडे यांना ताकद देण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्यातील नेते त्यांच्या कार्यालयाला भेटी देत आहेत. नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी देखील त्यांच्या कार्यालयाला भेट दिली होती. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार देखील त्यांच्या संपर्कात असून शहरातील घडामोडींवर लक्ष ठेवून असल्याची चर्चा राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.
पिंपरी विधानसभेत सत्ताधारी भाजपाची व्युहरचना…
पिंपरी विधानसभेत भारतीय जनता पार्टीला कार्यकर्त्यांचे जाळे विणण्यात अद्यापपर्यंत अपयश आले आहे. त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार आण्णा बनसोडे यांचे मोठे प्राबल्य आहे. मतदारसंघातील झोपडपट्टीमध्ये आमदार बनसोडे यांना मानणारा वर्ग मोठा आहे. या मतदार संघात योग्य कामगिरी करता न आल्याचे भाजपा पिछाडीवर पडत होते. त्यामुळे होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीत पिंपरी मतदारसंघात भाजपाला मानणारा वर्ग वाढविण्यासाठी पक्षाच्या व्युहरचना सुरू आहेत. बुथ बांधणी, प्रभाग निवडी सुरू केल्या आहेत. भाजपाच्या या व्युहरचना आमदार बनसोडे कसे भेदणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरत आहे.