“…अपेक्षा राज्य सरकारकडून होती”, नारायण राणेंच्या ‘त्या’ वक्तव्याला राम कदमांचा पाठिंबा
!["Expectations were from the state government", Ram Kadam supports Narayan Rane's statement](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/Ram-Kadam-1.jpg)
पुणे |
केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते नारायण राणे यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद आता राज्यभरात उमटू लागले आहेत. राणेंच्या वक्तव्यामुळे शिवसैनिक चांगलेच संतापले असून राणेंवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. तसंच त्यांच्या अटकेचे आदेशही काढण्यात आले आहेत. शिवसेना जरी या वक्तव्याचा निषेध करत असली तरी भाजपा नेते मात्र नारायण राणेंच्या या वक्तव्याला पाठिंबा देताना दिसत आहेत. भाजपा आमदार अतुल भातखळकर यांच्यानंतर आता राम कदम यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया देत नारायण राणेंच्या वक्तव्याला पाठिंबा दिला आहे. या विषयावर राम कदम यांनी एबीपी माझाशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले, “जन आशीर्वाद यात्रेदरम्यान राज्यातल्या जनतेचा असंतोष, उद्रेक बाहेर येऊ लागल्याने आता सरकार धास्तावलं आहे. त्यामुळे ही यात्रा थांबवण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. शिवसेना, राष्ट्रवादीच्या सभा झाल्या, गर्दी झाली. मात्र त्यांच्यावर कोणताही गुन्हा नाही. राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेवर मात्र ५० पेक्षा जास्त गुन्हे. त्यामुळे राणेंना अटक हे राजकीय सूडापोटी करण्यात आलेलं कारस्थान आहे”.
“राणेंच्या केंद्रीय मंत्रीपदाची गरिमा राखण्याची अपेक्षा राज्य सरकारकडून होती. जसं मुख्यमंत्रीपद महत्त्वाचं आहे, तसंच केंद्रीय मंत्रीपदही महत्त्वाचं आहे. राजकीय सूडापोटी केंद्रीय मंत्र्यांना अटक करण्याचे आदेश देणं हा सरकारचा डरपोकपणा आहे. हे सगळे प्रयत्न भाजपाची जन आशीर्वाद यात्रा थांबवण्यासाठी सुरु आहेत”, असंही राम कदम म्हणाले. राणेंच्या वक्तव्याचं समर्थन करताना राम कदम म्हणतात, “नारायण राणेंची शैली आक्रमक आहे. उद्धव ठाकरेंची शैली तर यापेक्षाही जास्त आक्रमक आहे. त्यांची आधीची भाषणं काढून पाहा ते काय बोलले आहेत. त्यांची दसरा मेळाव्यातली भाषणं ऐका. त्यामुळे नारायण राणेंच्या शैलीमुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल कऱणं हा सरकारचा रडीचा डाव आहे”.