अस्वती दोरजे नागपूरच्या नव्या पोलीस आयुक्त
नागपूर – गेल्या दोन महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बढत्या आणि बदल्यांना अखेर सोमवारी मुहूर्त मिळाला. ११ अधिकाऱ्यांना पदोन्नतीसह एकूण ३८ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश गृह विभागाच्या वतीने रात्री उशिरा जारी करण्यात आले. त्यानुसार नाशिकमधील महाराष्ट्र पोलीस अकादमी संचालकपदी असलेल्या अस्वती दोरजे यांची नागपूर शहरात सहपोलीस आयुक्त म्हणून बदली झाली असून त्यांच्या जागेवर राजेश कुमार मोर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मोर हे केंद्रीय प्रतिनियुक्तीवरून पदस्थापनेच्या प्रतिक्षेत होते. तर छेरिंग दोरजे हे नागपूर परिक्षेत्राचे नवे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून बदलून येणार असून, आतापर्यंत या पदावर असलेले चिरंजीव प्रसाद यांची राज्य राखीव पोलीस दलाचे अतिरिक्त महासंचालक म्हणून मुंबईला बदली झाली आहे.
दोरजे दाम्पत्याने यापूर्वी विदर्भात सेवा दिली आहे. छेरिंग दोरजे यांनी चंद्रपूर आणि अस्वती दोरजे यांनी वर्धा येथे पोलीस अधीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. अस्वती या प्रख्यात दाक्षिणात्य चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, पद्मविभूषण व दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते अदूर गोपालकृष्णन यांच्या कन्या होय.
दरम्यान, पिंपरी-चिंचवडचे अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांची ठाण्याला बदली झाली आहे. त्यांच्या जागी पुण्यातील संजय शिंदे आले आहेत. तर पिंपरीतील पोलीस आयुक्त सुधीर हिरेमठ यांना सीआयडीत उपमहानिरीक्षक (डीआयजी) म्हणून पदोन्नती दिली गेली आहे. तसेच पुण्याचे अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे यांची ठाण्यात बदली केली गेली आहे. सोलापूरचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची पदोन्नतीवर मुंबईत बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी ठाण्यातील अप्पर पोलीस आयुक्त डी. आर. कराळे आले आहेत.