चारच महिन्यापूर्वी प्रेमविवाह केलेल्या पत्नीची हत्या करून पती फरार
![Husband absconding after killing his wife four months ago](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/gala-dabun-khun-1.jpg)
पुणे | अवघ्या चार महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केलेल्या पत्नीचा गळा दाबून खून करुन पती फरार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सिंहगड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील धायरी परिसरात शुक्रवारी रात्री हा प्रकार उघडकीस आला. दिशा अजय निकाळजे (वय 19, धायरी) असे खून झालेल्या विवाहितीचे नाव आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी अधिक माहिती अशी की, अवघ्या चार महिन्यापूर्वी दिशा आणि अजय यांचा प्रेमविवाह झाला होता. सुरुवातीला ते जनता वसाहत परिसरात राहत होते. काही दिवसांपूर्वीच ते धायरी परिसरात एका भाड्याच्या घरात राहण्यासाठी गेले होते. तर अजय निकाळजे हा मिळेल ती कामे करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता.
दरम्यान शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास अजयचे कुटुंबीय धायरी येथील घरी आले असता त्यांना दिशा ही बेशुद्धावस्थेत पडल्याची दिसली. त्यांनी तिला तत्काळ उचलून रुग्णालयात दाखल केले. तपासणी अंती डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. डॉक्टरांना हा प्रकार संशयास्पद वाटल्याने त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली.त्यानंतर सिंहगड रस्ता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मयत विवाहितेचा पती अजय निकाळजे हा सध्या फरार असून त्याचा फोनही स्विच ऑफ येतोय. दिशाच्या गळ्यावर व्रण दिसत असल्याने तिचा खून झाला असण्याची शक्यता वर्तवली जातेय. शवविच्छेदन अहवालातून मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल असे पोलिसांनी सांगितले. सिंहगड पोलिस अधिक तपास करत आहेत.