कांदा यंदा मुबलक; शेतकऱ्यांकडून साठवणूकही मोठी! दरवाढीची शक्यता नाही
![सोलापुरात जानेवारीत कांद्याची उच्चांकी आवक](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/09/KANDA-6.jpg)
पुणे/ नाशिक/ ठाणे |
कांद्याचा साठा मुबलक असून आवकही नियमित होत आहे. त्यामुळे कांद्याचे दर स्थिर राहण्याची शक्यता कांदा व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. कांद्याला अपेक्षित दर मिळत नसल्याने सध्या शेतक ऱ्यांकडून कांदा साठवणूक करण्यात येत आहे. सध्या घाऊक बाजारात कांद्याला प्रतवारीनुसार १५ ते १८ रुपये किलो असा भाव मिळत आहे. किरकोळ बाजारात २५ ते ३० रुपये दराने विक्री केली जात आहे. अतिवृष्टी झाल्यास नवीन कांदा लागवडीवर परिणाम होऊ शकतो. सध्या कांद्याची आवक नियमित होत असून कांदा दरवाढीची शक्यता अजिबात नाही, अशी माहिती कांदा व्यापारी रितेश पोमण यांनी दिली.
पुणे जिल्ह्यातील शिरूर, खेड, आंबेगाव, जुन्नर या तालुक्यात कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. साठवणुकीतील जुन्या कांद्याच्या प्रतवारीवर परिणाम होत चालला आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज ३० ते ४० गाड्यांमधून कांद्याची आवक होत आहे. नाशिक, नगर या भागात कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणावर होते. पुणे जिल्ह्यातून राज्यातील अन्य बाजार समितीत कांदा मोठ्या प्रमाणावर विक्रीस पाठविला जात आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक, राजस्थान, मध्य प्रदेशात कांदा लागवड होते. परराज्यातून कांद्याची मागणी कमी झाली आहे. गेल्या वर्षीप्रमाणे कांदा लागवडीस अतिवृष्टीचा फटका न बसल्यास कांदा दर स्थिर राहतील, असे पोमण यांनी सांगितले.
- लासलगाव बाजारात आवक वाढली
गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे प्रतिक्विंटलचे दर १६०० ते १८०० रुपये दरम्यान आहेत. नाफेडने कांदा खरेदी केल्यानंतर कांदा दर दोन हजार क्विंटलपर्यंत पोहोचले होते. ऑगस्ट महिन्यात कांद्याची आवक कमी होते. मात्र, यंदा कांद्याची आवक नियमित होत असून नाशिकमधील लासलगाव बाजारात दररोज १५ हजार क्विंटल कांद्याची आवक होत आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात लासलगाव बाजार समितीत पाच लाख क्विंटल एवढी कांद्याची आवक झाली होती. यंदाच्या वर्षी ऑगस्ट महिन्यातील पहिल्या दहाच दिवसात अडीच लाख क्विंटल कांद्याची आवक झाली आहे. येत्या काही दिवसांत कांद्याची आवक आणखी वाढणार आहे. मात्र, नवीन कांद्याच्या लागवडीवर परिणाम न झाल्यास सप्टेंबर महिन्यात कांद्याचे दर वाढू शकतात, अशी शक्यता नाफेडचे माजी उपाध्यक्ष चांगदेवराव होळकर यांनी व्यक्त केली.
- वाशीतील बाजारात नियमित आवक
वाशीतील नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कांद्याची आवक चांगली होत असून गुरुवारी (१२ ऑगस्ट) ६४ गाड्यांमधून ६ हजार ९२५ क्विंटल कांदा विक्रीस पाठविण्यात आला. घाऊक बाजारात एक किलो कांद्याची विक्री १४ ते २० रुपये दराने केली जात आहे. ठाणे, डोंबिवली, मुंबई परिसरात किरकोळ बाजारात एक किलो कांद्याची विक्री ३० ते ३५ रुपये किलो दराने केली जात आहे.
- गेल्या वर्षी…
गेल्या वर्षी नवीन कांदा लागवडीला पावसाचा फटका बसला होता. जुन्या कांद्याचा साठा संपला होता. बाजारात कांद्याचा तुटवडा निर्माण झाला होता. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात किरकोळ बाजारात ८० ते १०० रुपये किलो असा उच्चांकी दर कांद्याला मिळाला होता.
- यंदाची स्थिती…
यंदा एप्रिलपासून उपाहारगृहचालक आणि खाणावळचालकांकडून कांद्याला असलेली मागणी एकदम कमी झाली. विवाह समारंभ पुढे ढकलण्यात आल्याने कांद्याला मागणी कमी राहिली.
सध्या कांद्याला अपेक्षित दर नाहीत. त्यामुळे शेतक ऱ्यांनी कांदा साठवणुकीवर भर दिला आहे. सध्या बाजारात दररोज कांद्याची आवक नियमित होत असून कांदा दर स्थिर राहणार आहे.