टोळक्याकडून तरुणाचा खून; दोघांना अटक
पिंपरी चिंचवड | एका तरुणाला तू वेडा आहे असे वारंवार चिढवल्याने तरुणाने चिडवणा-यांना काठीने मारहाण केली. त्यावरून टोळक्याने तरुणाला बेदम मारहाण करत त्याचा खून केला. ही घटना गुरुवारी (दि. 5) दुपारी तीन वाजताच्या सुमारास मिलिंदनगर, पिंपरी येथे घडली.
मनोज राजू कसबे (वय 25) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पुष्पा राजू कसबे (वय 50, रा. मिलिंदनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार काळ्या उर्फ सचिन निकाळजे (वय 40), शौकत समीर शेख (वय 32, दोघे रा. मिलिंदनगर, पिंपरी), चिम्या उर्फ सुरेश निकाळजे, मनोज अर्जुन जगताप, आनंद कदम, संतोष कदम, भूषण डुलगल व इतर साथीदार (सर्व रा. पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी काळ्या आणि शौकत या दोघांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मयत मुलगा मनोज कसबे याला आरोपींनी ‘तू वेडा आहे’, असे वारंवार चिडवले. त्यावर मनोज याने ‘मी वेडा नाही तुम्हीच वेडे आहात’, असे म्हटले. त्यानंतरही आरोपींनी मनोजला पुन्हा वेडा म्हणून चिडवले. या कारणावरून मनोजने चिडवणा-यांना काठीने मारहाण केली.
या कारणावरून आरोपींनी मनोजला प्लास्टिकची खुर्ची, लाकडी स्टंप, लाकडी बांबू आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून जखमी केले. त्यात मनोजचा मृत्यू झाला. याबाबत रविवारी (दि. 8) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.