बंदुकीच्या धाकाने ८७ हजारांची लूट
![Robbery of Rs 87,000 at gunpoint](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/raj01-2.jpg)
- चोरांची छायाचित्रे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
हिंगोली |
वसमत शहरातील साई गॅस एजन्सीजवळ पैसे भरण्यासाठी बँकेत जाणाऱ्या कर्मचाऱ्याला बंदुकीचा धाक दाखवून चोरटय़ांनी ८७ हजार रुपये पळविल्याची घटना गुरुवारी सकाळी साडेआकरा वाजता घडला. या प्रकारामुळे वसमत शहरात एकच खळबळ उडाली आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकराची चौकशी आणि तपास करण्यासाठी पोलिसांचे विशेष पथक नियुक्त करण्यात आले आहे. वसमत शहरातील मालेगाव रोड भागात साई गॅस एजन्सी आहे. गॅस एजन्सीचे कर्मचारी गजानन दरंगे हे बुधवारी जमा झालेल्या ८७ हजार रुपयांची रक्कम भरण्यासाठी बँकेत निघाले होते. तिथे बंदूक रोखून चोरटय़ांनी लूट केली असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात छायाचित्रात दिसून आले.
लूट करणाऱ्या दोघा जणांनी तोंडाला रुमाल बांधले होते. एजन्सीमधून दरंगे खाली उतरताच दुचाकीवर आलेले दोघे त्यांच्या समोर थांबले. त्यापैकी एकाने त्यांना बंदुकीचा धाक दाखवून बॅग देण्याची मागणी केली. बंदुकीच्या धाकामुळे कर्मचाऱ्याला हालचाल करता आली नाही. त्यानंतर चोरटय़ांनी बॅग घेऊन पोबारा केला. या वेळी चोरटय़ास पकडण्यासाठी आरडाओरडा करून गजानन दरंगे यांनी मदतही मागितली. पण त्यांना मदत मिळू शकली नाही. या प्रकाराची माहिती मिळताच सहायक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी गुरमे, सहायक पोलिस निरीक्षक श्रीदेवी पाटील, उपनिरीक्षक प्रकाश आवडे यांच्यासह पोलिसांचे पथक चोरटय़ांच्या शोधात आहे. नांदेड, परभणी येथे चोरटय़ांना पकडण्यासाठी पथके पाठविण्यात आली आहेत. ही लूट पाळत ठेवून केल्याचा पोलिसांचा कयास असून पैसे भरण्यासाठी कर्मचारी कधी येतो, याची माहिती चोरटय़ांना पूर्वीपासून असावी असे सांगण्यात येत आहे.