करोनाने निधन झालेल्या व्यक्तीच्या इच्छेप्रमाणे विठ्ठल मंदिरास एक कोटींचे दान
![Donation of one crore to Vitthal temple as per the wish of the deceased](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/pandhapur-1200.jpg)
पंढरपूर |
पंढरीच्या विठुरायाच्या चरणी गरिबांपासून ते श्रीमंतापर्यंत अनेक जण आपल्या इच्छेप्रमाणे दान देत असतात. मात्र गुरुवारी मुंबईतील एका महिलेने पतीचे करोनाने निधन झाल्यानंतर त्याच्या इच्छेनुसार तब्बल एक कोटी रुपयांचे दान विठ्ठल चरणी अर्पण केले आहे. विठ्ठल चरणी आलेल्या या आगळ्या-वेगळ्या दानाची चर्चा होत आहे. पंढरीच्या सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी राज्य-परराज्यातून रोज हजारो भाविक येत असतात. मुंबईत राहणारे हे दाम्पत्यदेखील या विठ्ठलाचे भाविक होते. ते नित्य दर्शनासाठी येत होते. परंतु करोनामुळे त्यांना येणे अवघड झाले. दरम्यान या दाम्पत्यातील पतीला करोनाची बाधा झाली. त्यांचा आजार बळावल्यावर त्यांनी आपल्या मृत्यूनंतर हे दान देण्याची इच्छा पत्नीजवळ बोलून दाखवली.
पंढरीतील विठ्ठल हा गोरगरीब, कष्टकरी, शेतकऱ्यांचा देव मानला जातो. यामुळे या देवस्थानाकडे जमा होणारी देणगीदेखील अन्य देवस्थानांच्या तुलनेत कमी असते. त्यातच गेल्या दीड वर्षांपासून करोनामुळे मंदिर बंद असल्याने या संस्थानकडे जमा होणाऱ्या दान,देणगीचा ओघ थंडावला आहे. हेच वृत्त कानी आलेले असल्याने आपल्या पश्चात ही सगळी रक्कम विठ्ठल मंदिराला देण्याविषयीची इच्छा त्यांनी बोलून दाखवली होती. पुढे काही दिवसांनी त्यांचे निधन झाले. यानंतर काही दिवस गेल्यावर आज त्यांच्या पत्नी पंढरपूरमध्ये येत त्यांनी या रकमेचा धनादेश मंदिर संस्थानकडे सुपूर्द केला.
- पतीची इच्छा पूर्ण
आम्ही दोघे जण नेहमी पंढरपूरला येऊन श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचे दर्शन घेत होतो. यथाशक्ती दान देत होतो. मात्र करोनामुळे दीड वर्षात येणे झाले नाही. त्यातच पतीला करोना झाला. त्यात त्यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूपश्चात त्यांची विमा आणि अन्य अशी १ कोटी रुपयांची रक्कम विठुराया चरणी दान देण्याची इच्छा माझ्या पतीची होती. ती आज मी पूर्ण केली. या बाबत माझे नाव गुप्त ठेवा अशी विनंती मंदिर समितीला केली आहे, असे सदर महिलेने सांगितले.
मुंबई येथे राहणाऱ्या या महिलेने पतीच्या इच्छेनुसार देणगीचा धनादेश मंदिर समितीला सुपूर्द केला. त्यामागच्या त्यांच्या भावनांची दखल घेत या मोठ्या रकमेचा मंदिर समितीकडून योग्य कामासाठी विनियोग केला जाईल. – ह. भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर, सह अध्यक्ष, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती