निगडी भक्ती-शक्ती चौकातील उड्डाणपुल, ग्रेडसेपरेटरमध्ये अपघातांची मालिका: सचिन चिखले
![A series of accidents at the flyover, grade separator at Nigdi Bhakti-Shakti Chowk: Sachin Chikhale](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/07/WhatsApp-Image-2021-07-30-at-8.23.32-PM.jpeg)
- उपाययोजना करण्यासाठी आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन
- वाहतूक पोलीस पालिका अधिकाऱ्यांनी समक्ष पाहणी करण्याची मागणी
पिंपरी । प्रतिनिधी
निगडी येथील भक्ती-शक्ती चौकामध्ये नव्याने उभारण्यात आलेल्या उड्डाणपुल व ग्रेड सेपरेटर येथे वाहतुक सुरू झाली आहे. मात्र येथे पुरेशा सुरक्षा उपाययोजनांची, वाहतूक पोलीस किंवा पालिकेचे सुरक्षा कर्मचारी यांची नियुक्ती न झाल्याने येथे अपघातांची मालिका सुरू झाली आहे. याची वेळीच दखल घेत सुरक्षा उपाय योजना पुरेशा प्रमाणात वाढवाव्यात अशी मागणी मनसेचे गटनेते व नगरसेवक सचिन चिखले यांनी केली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांना मनसेचे गटनेते व नगरसेवक सचिन चिखले यांनी निवेदन दिले आहे. यात त्यांनी निगडी येथील भक्ती-शक्ती चौकामध्ये नव्याने उभारण्यात आलेल्या उड्डाणपुल व ग्रेड सेपरेटर येथे अपुऱ्या प्रमाणात असलेल्या वाहतूक सुरक्षा उपाययोजनांबाबत लक्ष वेधले आहे.
आयुक्तांना दिलेल्या निवेदनात सचिन चिखले यांनी म्हटले आहे की, भक्ती-शक्ती चौकामध्ये आता नव्याने ग्रेड सेपरेटर ,उड्डाणपुलाचे काम करण्यात आलेे. येथे वाहतुक देखील सुरू झाली आहे. मागील एक महिन्यापासून वाहतूक सुरू झाली वाहतूक चालू झाल्यापासून अपघातामुळे आत्तापर्यंत तीन जण मृत्युमुखी, तर सहा जणांना अपघात होऊन अपंगत्व आलेे आहे. आज देखील (दि. 30) एका व्यक्तीचा या ठिकाणी अपघात झाला व त्यात त्याचा मृत्यू देखील झाला आहे. सध्या पावसाळा सुरू आहे. पावसाळ्यात रस्ते निसरडे झालेले असतात. अंधार असतो त्यामुळे बरेचदा दिशादर्शक, साईड पट्टी ,सुरक्षा रक्षक यांची कोणतेही रस्त्यावर आवश्यकता असते. मात्र यांसारखी उपाययोजनाा पुरेशा प्रमाणात निगडी येथील उड्डाणपुलावर किंवा ग्रेड सेपरेटर येेथे नाही. त्यामुळे या पुलावर लवकरात लवकर वाहतूक पोलीस, पालिका अधिकारी वर्ग यांनी समक्ष पाहणी करावी. येथील नागरिकांची होणारी गैरसोय, सुरक्षा उपाययोजना यांचा आढावा घ्यावा. आणि त्या दृष्टीने तातडीने या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात यावी. अन्यथा नाहक येथे अपघातांची मालिका सुरू राहून नागरिकांना त्याचा भुर्दंड सोसावा लागेल.
- …या उपाययोजनांची गरज
– दर महत्वाच्या वळणावर व रोटरी पुलावर रर्मलर बसविण्यात यावे.
– योग्य त्या ठिकाणी दिशादर्शक लावण्यात यावेत, एकेरी वाहतूक करत असताना नागरिकांना समजण्यासाठी स्पष्ट फलक लावण्यात यावे.
– ट्रान्सपोर्ट नगरी पासून येणाऱ्या रस्त्याजवळ योग्य त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर लावून दिशादर्शक फलक लावण्यात यावे.