राजकारणातून सन्यास घेईन; पण भाजपा सोडणार नाही : नगरसेवक तुषार कामठे
![Will retire from politics; But BJP will not leave: Corporator Tushar Kamthe](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/07/WhatsApp-Image-2021-07-20-at-18.38.56.jpeg)
भाजपामधून राष्ट्रवादीत प्रवेशाच्या शक्यतेला पूर्णविराम
स्थानिक नेत्यांबाबत नाराजी पण, पक्षासोबत कायम
पिंपरी । अधिक दिवे
एकवेळ राजकारणातून सन्यास घेईन; पण भारतीय जनता पार्टीतून बाहेर पडणार नाही. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या विचारांनी राजकीय जीवनात कार्यरत आहे, असा विश्वास भाजपाचे नगरसेवक तुषार कामठे यांनी ‘महाईन्यूज’शी बोलताना व्यक्त केला.
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची नगरसेवक कामठे यांनी नुकतीच भेट घेतली. यावेळी ‘वचनपूर्ती’ हा कार्यअहवाल यांनी फडणवीस यांना दाखवला. तसेच, ‘भक्ती-शक्ती’ शिल्प भेट दिले.
विशेष म्हणजे, केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, पक्षाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांची कामठे यांनी भेट घेतली आहे. त्यामुळे नगरसेवक कामठे भाजपातून राष्ट्रवादीत प्रवेश करतील, अशा चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका प्रभाग क्रमांक २६ मधून नगरसेवक तुषार कामठे २०१७ मध्ये भाजपाच्या तिकीटावर निवडून आले आहेत. गेल्या चार-साडेचार वर्षांच्या कार्यकाळात भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी कामठे यांना महत्त्वाच्या पदापासून वंचित ठेवले. तसेच, कामठे यांनी सत्तेत असतानासुद्धा चुकीच्या कामांना विरोध करण्याची भूमिका घेतली होती. त्यामुळे स्थानिक नेत्यांककडून दुजाभाव मिळत असल्यामुळे नगरसेवक कामठे काहीसे नाराज आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर कामठे राष्ट्रवादीत प्रवेश करतील, अशी चर्चा होती. यासह नगरसेवक कामठे आणि राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार यांची बैठक झाल्याचेही बोलले जात होते. मात्र, कामठे यांनी स्वत: याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे.
स्थानिक नेत्यांबाबत नाराजी पण…
भाजपाच्या स्थानिक नेत्यांमुळे क्षमता असूनही महापालिकेत चांगल्या पदावर काम करण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे त्यांच्याबाबत नाराजी असेलही, पण पक्षाशी बांधिलकी कायम आहे. पक्ष संघटनेच्या आदेशानुसार मी यापुढील काळात कार्यरत राहणार, असेही नगरसेवक कामठे यांनी म्हटले आहे. त्यामुळे नगरसेवक कामठे यांची पक्षनिष्ठा शहरातील अनेकांच्या डोळ्यांमध्ये अंजन घालणारी आहे.