कॅनडा, अमेरिकेत उष्णतेचा कहर; रस्त्यांना तडे
ओटावा – संपूर्ण जग सध्या कोरोना महामारीशी लढत असतानाच अमेरिका आणि कॅनडातील नागरिकांना भीषण उष्णतेचाही सामना करावा लागत आहे. कॅनडाच्या पश्चिम भागात आणि अमेरिकेच्या प्रशांत उत्तर-पश्चिम भागात सूर्याने आग ओकावी इतक्या कडक उष्णतेचा कहर लोकांना सोसावा लागत आहे. प्रचंड उष्ण वातावरणामुळे या दोन्ही देशांमध्ये अनेकांनी आपला जीव गमावल्याचेही वृत्त आहे. त्याचबरोबर तापमान ४६ डिग्री सेल्सियसच्या पार गेल्याने या देशांतील काही ठिकाणी उष्ण वातावरणामुळे रस्त्यांना तडे जात असल्याचेही समोर आले आहे. इतकेच नाही तर, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंनुसार येथील धातूंचे बांधकाम असलेली घरे उष्णतेमुळे काही प्रमाणात वितळल्याने त्यांचे आकारही बदलल्याचे दिसत आहे.
जगभरात ठिकठिकाणी कोरोनाच्या लाटांपासून संरक्षणासाठी लॉकडाऊन केला जात असतानाच कॅनडात उष्णतेच्या लाटांपासून वाचण्यासाठी शाळा, महाविद्यालये, व्यवसाय आणि कोविड सेंटर बंद ठेवण्यात आले आहेत. जेणेकरून लोकांनी घराबाहेर पडू नये, परंतु घरातही वाढत्या तापमानाची दाहकता पोहोचत असल्याने येथील लोक घराबाहेर पडून स्विमिंग पूल आणि आईस्क्रिम पार्लरमध्ये जाण्यास पसंती देत आहेत.
धक्कादायक म्हणजे, कॅनडातील हवामान खात्यानुसार, ही केवळ सुरुवात असून जुलैमध्ये ऊन अधिक वाढणार आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.





