ठाणे ग्रामीण भागात लसीकरणाचा वेग वाढवावा
![The vaccine will be available at 72 centers in Pimpri-Chinchwad on Monday](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/06/coronavirus-vaccine-1.jpg)
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांचे आदेश
ठाणे | ठाणे ग्रामीण क्षेत्रात लसीकरणाचा वेग वाढविण्यावर भर द्यावा, करोना प्रतिबंधक लसीकरणासाठी लाभार्थी असणाऱ्या सर्व नागरिकांचे लसीकरण पूर्ण होईल, यादृष्टीने नियोजन करावे असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी आरोग्य विभागाला दिले आहेत.
करोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सज्ज झाली असतानाच ग्रामीण भागात मोठय़ा प्रमाणावर लाभार्थी नागरिकांचे लसीकरण व्हावे यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. लसीकरणाची प्रक्रिया सहज सुलभ व्हावी यासाठी ऑनलाइन आणि प्रत्यक्ष केंद्रावर नोंदणीची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. प्रत्येक केंद्राला दिलेले उद्दिष्ट साध्य करण्याबरोबर नागरिकांना लसीकरणासाठी माहिती, शिक्षण आणि संवादाद्वारे प्रोत्साहित करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब दांगडे यांनी आरोग्य विभागाला केल्या आहेत. लसीकरणासह नागरिकांची आरोग्य तपासणी, सर्वेक्षण आणि करोना चाचणीचे प्रमाण वाढविण्यावरही भर देण्यास सांगितले आहे. या आढावा बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रूपाली सातपुते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, ग्रामपंचायत उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकात पवार आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनीष रेंघे उपस्थित होते.