काश्मीरमध्ये एके-47 घेऊन फरार पोलीसकर्मी बनला दहशतवादी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/terrorists-.jpg)
श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – काश्मीरमध्ये एके-47 घेऊन फरार झालेला एक पोलीसकर्मी दहशतवादी बनल्याची माहिती देण्यात आली आहे. श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्गावरील पांपोर ठाण्याच्या प्रभारींच्या सुरक्षा दलातील हा पोलीस कर्मचारी आहे. तो दहशतवादी बनल्याचे पोलीस विभागाने अद्याप अधिकृतपणे जाहीर केलेले नसले, तरी हिजबूल मुजाहिदीनने एका निवेदनाद्वारे त्याच्या दहशतवादी बनण्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
एसपीओ (स्पेशल पोलीस ऑफिसर) इरफान अहमद डार असे या पोलीसकर्मीचे नाव असून तो काकपोरा पुलवामाचा रहिवासी आहे. आपली एके47, दोन मॅगझिन्स आणि काडतुसे घेऊन तो फरारी झाला आहे. मंगळवारे दुपारपर्यत कामावर हजर असलेला इरफान अचानक गायब झाला. संध्याकाळी त्याला बोलावले तरी तो मिळाला नाही आणि त्याचा मोबाईलही स्विच ऑफ होता. काकपोरा आणि त्याच्या जवळपासच्या भागातील अनेक युवक गेल्या दोन वर्षांत दहशतवादी बनलेले आहेत.
हिजबूल मुजाहिदीनचा प्रवक्ता गाजी बुरहानुद्दीन याने स्थानिक मीडियाला फोन करून एसपीओ इरफान अहमद डार बेपत्ता नसून हिजबूल मुजाहिदीनला सामील झाल्याची माहिती दिली.