देशातील 50 कोटी नागरीकांपर्यंत सामाजिक सुरक्षा योजना पुरवल्या
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/pm-modi-speaks-with-beneficiaries-in-marathi-language-.jpg)
नवी दिल्ली – आपल्या सरकारने गेल्या चार वर्षात देशातील सुमारे 50 कोटी लोकांपर्यंत सामाजिक सुरक्षा योजना पुरवली आहे अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिली. ते म्हणाले सन 2014 पर्यंत जितक्या लोकांपर्यंत या योजना पोहचल्या होत्या त्याच्या दहापटीने ही संख्या अधिक आहे. पंतप्रधानांनी विविध सामाजिक सुरक्षा योजनांच्या लाभार्थ्यांशी आज संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले की जीवन हे नेहमीच अनिश्चीत असते. अशा अनिश्चीततेचा सामना करण्याची ताकद सामाजिक सुरक्षा योजनांमुळे मिळत असते. प्रधानमंत्री जीवन विमा योजना, प्रधानमंत्री जीवन सुरक्षा योजना, अटल पेन्शन योजना, प्रधानमंत्री व्यय वंदना योजना अशा योजनांमुळे लोकांपर्यंत ही सामाजिक सुरक्षा योजना पुरवली गेली आहे.
आपले सरकार सत्तेवर येई पर्यंत लोकांना अशा प्रकारच्या सामाजिक सुरक्षा योजना पुरेशा प्रमाणात उपलब्ध नव्हत्या. पण आम्ही त्यांना या विमा योजना उपलब्ध करून दिल्या आहेत. प्रधानमंत्री जनधन योजनेमार्फत लोकांना आयुर्विमा दिला जात आहे असे ते म्हणाले. त्यामुळे अशा सुरक्षा योजनांचे खातेदार आता 50 कोटी झाले आहेत. सन 2014 पर्यंत या लाभार्थ्यांची संख्या केवळ 4.8 कोटी इतकी होती असे ते म्हणाले. जनधन योजनेत महिलांची खातीही मोठ्या प्रमाणात उघडली गेल्याने त्यांना आर्थिक समावेशन योजनेत सहभागी होता आले आहे असेही मोदींनी नमूद केले.