फ्रेंच ओपन : झुंजार त्सित्सिपासला नमवत लढवय्या जोकोव्हिचनं पटकावलं १९वं ग्रँडस्लॅम जेतेपद
पॅरिस । टीम ऑनलाईन
एकीकडे यूरो कप स्पर्धा रंगत असताना दुसरीकडे टेनिस चाहत्यांना रविवारी फ्रेंच ओपनचा थरार अनुभवायला मिळाला. ग्रीसचा २२ वर्षाचा टेनिसपटू स्टेफानोस त्सित्सिपास आणि जगातील प्रथम क्रमांकाचा सर्बियाचा टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हिच पुरुष एकेरीतील अंतिम सामन्यात एकमेकांसमोर उभे ठाकले होते. सुरुवातीचे दोन सेट गमावलेल्या जोकोव्हिचने उर्वरित सामन्यात सर्व अनुभव पणाला लावत पुनरागमन केले. पाच सेटपर्यंत रंगलेल्या सामन्यात जोकोव्हिचने त्सित्सिपासला ६-७, २-६, ६-३, ६-२, ६-४ असे हरवत फ्रेंच ओपनचे दुसऱ्यांदा जेतेपद पटकावले.
राफेल नदाल, रॉजर फेडरर याआधीच स्पर्धेबाहेर झाल्याने जोकोव्हिचसाठी फ्रेंच ओपनचा अंतिम सामना सोपा जाईल असेल वाटत होते, मात्र, युवा त्सित्सिपासने त्याला बरेच थकवले. तब्बल चार तासांपेक्षा जास्त वेळ चाललेल्या सामन्यात त्सित्सिपासने झुंजार कामगिरीचे प्रदर्शन केले. सुरुवातीचे दोन सेट मोठ्या फरकाने जिंकल्यानंतर त्सित्सिपासचा आत्मविश्वास दुणावला होता. मात्र, जोकोव्हिचने तिसरा सेटमध्ये आक्रमक खेळ करत ६-३ असा सेट जिंकला. त्यानंतर पुढच्या दोन सेटमध्ये त्सित्सिपासने चुका केल्या, ज्याचा फायदा जोकोव्हिचने उचलला. अंतिम सामन्यात त्सित्सिपासने पुनरागमनाचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत उशीर झाला.