पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण विलीनीकरणाची अधिसूचना जारी!
![Pimpri Chinchwad Navnagar Development Authority merger notification issued!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/04/PCNTDA.jpg)
पिंपरी |महाईन्यूज|
पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे (पीसीएनडीटीए) पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामध्ये (पीएमआरडीए) विलीनीकरणाची अधिसूचना राज्य शासनाकडून सोमवारी प्रसिद्ध केली. त्यामुळे “पीसीएनडीटीए’चे अस्तित्व संपुष्टात आले आहे. या अधिसूचनेनुसार विकसित भाग पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये, तर अविकसित भाग पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीत समाविष्ट होणार आहे.
पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचा समावेश “पीएमआरडीए’मध्ये करण्याबाबत चर्चा सुरू होती. अखेर सोमवारी त्यावर शिक्कामोर्तब झाले. या निर्णयामुळे “पीसीएनडीटीए’चे विलीनीकरण करण्यावर शिक्कामोर्तब झाले असून “पीएमआरडीए’ची तसेच पिंपरी-चिंचवड महापालिकेची हद्द विस्तारणार आहे. विलीनीकरण करताना राज्य सरकारने पिंपरी प्राधिकरणाच्या सर्व मालमत्ता या “पीएमआरडीए’कडे हस्तांतरित केल्या आहेत. तसेच पिंपरी प्राधिकरणातील कर्मचारी “पीएमआरडीए’कडे वर्ग केला आहे.
पिंपरी-चिंचवड परिसरात औद्योगिक विकास झपाट्याने होत असल्याने तेथे काम करणाऱ्या कामगारांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी, कारखान्याजवळच त्यांच्या निवासाची सोय होणे आवश्यक होते. याबाबी विचारात घेऊन पुणे महानगर प्रादेशिक योजनांच्या शिफारशीनुसार पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची स्थापना 14 मार्च 1972 रोजी करण्यात आली होती.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची स्थापना 2015 मध्ये करण्यात आली. पुण्याचा एकात्मिक विकास करण्याच्या हेतूने “पीएमआरडीए’ची स्थापना केली. “पीएमआरडीए’च्या हद्दीत जिल्ह्यातील सुमारे 747 गावांचा समावेश होतो. “पीएमआरडीए’ची स्थापना झाल्यावर एकाच भागात दोन प्राधिकरणे कशासाठी, असा सवाल केला होता. त्यानुसार लवासा या हिलस्टेशनला असलेला विशेष प्राधिकरणाचा दर्जा मागील दोन वर्षांपूर्वी रद्द केला होता. त्याच धर्तीवर पिंपरी-चिंचवड प्राधिकरणाचे विलीनीकरण “पीएमआरडीए’मध्ये करणे अपेक्षित होते. मागील काही वर्षांपासून याबाबत पाठपुरावा सुरू होता. त्यास आता यश मिळाले आहे.
पिंपरी-चिंचवड प्राधिकरणाचे “पीएमआरडीए’मध्ये विलीनीकरण करण्याचा अत्यंत चांगला निर्णय आहे. “पीएमआरडीए’च्या हद्दीत समाविष्ट झालेल्या नवीन भागाचा सुनियोजित विकास करण्यावर भर राहणार आहे.
– सुहास दिवसे, आयुक्त पीएमआरडीए