उद्यापासून चार दिवस मुंबईसह कोकणाला अतिवृष्टीचा धोका
![Heavy rains in Konkan; Public life disrupted in Ratnagiri](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/monsoon_rain_rainfall_-770x433-1.jpg)
मुंबई – तौक्ते चक्रीवादळानंतर आता मुंबईसह कोकण किनारपट्टीला अतिवृष्टीचा धोका आहे. ९ ते १२ जून म्हणजेच उद्या, बुधवार ते शनिवार असे चार दिवस हवामान विभागाने मुंबईसह कोकणात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. यावेळी काही ठिकाणी दिवसभरात ३०० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची शक्यता असल्याने राज्य सरकारने सर्व जिल्हाधिकारी व प्रशासनाला अतिदक्षतेचा इशारा दिला आहे.
हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा अंदाज वर्तविण्यात आल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने मुंबई महानगर क्षेत्र, कोकणातील सर्व जिल्ह्यांतील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचा आढावा घेतला. ‘अतिवृष्टी काळात गरज पडल्यास मदतीसाठी तटरक्षक दल आणि नौदलाला तयार राहण्याची सूचना द्यावी. तसेच या अतिवृष्टीची माहिती स्थानिक प्रशासनाने नागरिकांनाही द्यावी, या काळात नद्यांचा प्रवाह बदलतो आणि त्यामुळे अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरते हे लक्षात घेऊन प्रशासनाने नागरिकांची काळजी घ्यावी. जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठका घेऊन संभाव्य मदतकार्याची रूपरेखा निश्चित करावी. त्याचबरोबर दरडग्रस्त गावांच्या पुनर्वसनाचे प्रस्ताव शासनाकडे आले असून, त्यांना तातडीने मंजुरी द्यावी. या गावांच्या पुनर्वसनाला लागणारा दीर्घ काळ विचारात घेता आता तातडीची गरज म्हणून या भागातील लोकांचे प्रशासनाने सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे’, असे निर्देश मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी दिले. या बैठकीला मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशीषकुमार सिंह यांच्यासह मुंबई व कोकणातील सर्व महानगरपालिकांचे आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधिकारी आदी उपस्थित होते.
रत्नागिरीत ११, १२ जूनला संचारबंदी
रत्नागिरी जिल्ह्यात १० जून रोजी मुसळधार, तर पुढील दोन दिवस अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे ११ व १२ जून रोजी जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात येणार आहे.