प्रशासनाने पावसाळापूर्व कामे त्वरीत मार्गी लावावीत – राजू मिसाळ
![पिंपरी-चिंचवडचे महापालिका मिळकतींची सुरक्षा राम भरोसे !](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/06/pcmc-1.jpg)
पिंपरी / महाईन्यूज
पिंपरी-चिंचवडमधील पावसाळापूर्व कामे त्वरीत मार्गी लावावीत, अशी मागणी विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात मिसाळ यांनी आयुक्तांना निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग चालू आहे. कोरोना बाधित रुग्ण शहरातील वेगवेगळ्या भागात सापडत आहेत. या अनुषंगाने पूर्ण देशभरात १५ जून पर्यंत संचारबंदी (लॉक डाऊन) लागू करण्यात आली आहे. कोरोनाच्या विरोधात मनपा युध्दपातळीवर प्रयत्न करत आहे, शहरात नागरीकांचे सर्वेक्षण करणे, बेघर, नागरीकांमध्ये कोरोना विरोधात जनजागृती करणे इत्यादी प्रयत्न करीत आहे.
परंतु, आता पावसाळा तोडावर आलेला आहे, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी नियमित शहरात होणारी विविध कामे प्रलंबित आहेत. उदा. शहरातील छोटे मोठे नाले साफसफाई करणे, शहरातील रस्ते खाजगी कंपनींच्या केबल्स टाकण्यासाठी खोदाई करण्यात आलेली आहे, त्यामुळे त्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे त्या रस्त्यांचे डांबरीकरण करणे गरजेचे आहे. नद्यांमधिल जलपर्णी काढणे त्याच प्रमाणे ठिकठिकाणी कच-यांचे ढीग ठिकठिकाणी साठलेले आहेत, ते पावसाळा सुरु होण्यापूर्वी हटविणे गरजेचे आहे.
जलनिस्सारण नलिका टाकण्याची कामे जिथे अर्धवट झालेली आहेत ती पूर्ण करणे, गटारे साफसफाई करणे, तसेच ऐन पावसाळ्यात वाढलेल्या झाडांच्या फांद्या महावितरणच्या लाईनवर पडून विद्युत पुरवठा खंडीत होणे, वाहतूक विस्कळीत होणे वेळप्रसंगी अपघात होऊन वित्त व जिवित हानी होण्याची शक्यता असते त्यामुळे शहरातील वाढलेल्या झाडांची छाटणी करणे. इत्यादी मान्सूनपूर्व कामे पावसाळा सुरु होणेपूर्वी पूर्ण होणे आवश्यक आहे. सद्यस्थितीमध्ये संचारबंदी १५ जून पर्यंत असली तरी सदरची मान्सूनपूर्व कामे होणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा शहरातील नागरीकांची प्रचंड गैरसोय होण्याची शक्यता आहे. तसेच स्मार्ट सिटी अंतर्गंत प्रलंबित असणारी कामेही मार्गी लावण्यात यावीत, अशी मागणी मिसाळ यांनी केली आहे.