Cyclone Tauktae : ‘या’ भागांतील नागरिक ४८ तास वीजपाण्याविना
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/light-bulb-2723403_960_720.jpg)
मुंबई – अरबी समुद्रातील भयानक ‘तौक्ते’ चक्रीवादळाने रौद्ररूप धारण करत रविवारी केरळ, कर्नाटकसह रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांना तडाखा दिला होता. त्यानंतर गुजरातच्या दिशेने जाताना चक्रीवादळाने सोमवारी कोकणासह मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये जोरदार धुमाकूळ घातला. तुफान वादळी वारे आणि मुसळधार पावसाने येथील जनजीवन अक्षरश: विस्कळीत झाले. अनेक ठिकाणी वीजवाहक तारा तुटल्या आणि रोहित्रेदेखील वादळामुळे पडली. महावितरणची विद्युत उपकेंद्रे खंडित झाली होती. परिणामी वसई, विरार शहरांसह पालघरमधील अनेक भागांतील नागरिकांना ४८ तासांपेक्षा अधिक वेळ विजपाण्याविना राहावे लागले. वीज नसल्याने मोबाईल आणि इंटरनेट सेवा ठप्प झाल्याने तालुक्यातील नागरिकांचा इतरांशी संपर्क तुटला होता.
दरम्यान, रविवारी मध्यरात्रीपासूनच अनेक ठिकाणचा वीजपुरवठा खंडित झाला होता. सोमवार सकाळपासून तर सर्वच ठिकाणाचा वीजपुरवठा बंद झाला. घरात असलेले इन्व्हर्टरदेखील बंद पडले. त्यामुळे मोबाईल फोन व लॅपटॉपदेखील चार्ज करता आले नाही. तर ज्यांचे थोडेफार सुरू होते, ते नेटवर्क नसल्याने निरुपयोगी ठरले. शिवाय वायफाय सुविधादेखील बंद होत्या. या सगळ्यात वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांचे प्रचंड हाल झाले.