मौलाना कादरींचा पाकिस्तानी निवडणुकीवर बहिष्कार
लाहोर – कॅनडाचे रहिवासी असलेल्या मौलाना ताहीरूल कादरी यांनी पाकिस्तानातील निवडणुकीवर बहिष्कार घोषित केला आहे. कादरी हे कॅनडा स्थित असले तरी त्यांचा पाकिस्तानातील जनमानसावर मोठा प्रभाव असून पाकिस्तान अवामी तेहरीक या पक्षाचेही ते संस्थापक आहेत. त्यांनी म्हटले आहे की पाकिस्तनातील निवडणुकीत गुन्हेगारी आणि भ्रष्ट प्रवृत्तीच्या लोकांना निवडणुक लढवण्यास अनुमती देण्यात आल्याने आम्ही या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. पकिस्तानात येत्या 25 जुलै रोजी मतदान होत आहे.
त्यांनी म्हटले आहे की उमेदवारी अर्जाची छाननी करताना देशाच्या घटनेतील कलम 62 आणि 63 चे पुर्ण उल्लंघन करण्यात आले आहे. ज्यांच्यावर सामुहिक हत्याकांड, दंगली घडवणे, भ्रष्टाचार आणि मानवी तस्करीचे आरोप आहेत अशांचे उमेदवारी अर्जही निवडणूक आयोगाने वैध ठरवले आहेत. त्यांनी या कृत्याद्वारे घटनेतील तरतूदींचा भंग केला आहे.
आम्ही दबाव आणल्यामुळेच नवाज शरीफ यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे असा दावाही त्यांनी केला आहे. त्यांची इम्रान खान यांच्या पक्षाशी आघाडी होती. तथापी त्यांनीही केवळ निवडून येण्याची क्षमता या एकाच मुद्द्यांवर भर देऊन उमेदवार निवडले आहेत असा आरोपही त्यांनी केला. अशा लोकांची मदत घेऊन इम्रानखान तरी कसा नवीन पाकिस्तान घडवणार असा सवालही त्यांनी केला आहे.