पुण्यातील कडक लाॅकडाऊनबाबत महापौर मुरलीधर मोहोळ यांचं सुचक वक्तव्य
![Public toilets broken, case filed against Pune mayor](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/Murlidhar-Mohol-Pune.jpg)
पुणे – पुणे आणि मुंबई सारख्या जिल्ह्यात रुग्णसंख्या जास्त असल्यानं कडक लॉकडाऊनचा विचार मुख्यमंत्र्यांनी करावा, अशी सूचना मुंबई उच्च न्यायालयाने केली होती. याच पार्श्वभुमीवर पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे आज पुण्यात आढावा बैठक घेणार आहेत. यावर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी कडक लाॅकडाऊनबाबत सुचक वक्तव्य केलं आहे.
उच्च न्यायालयात जी माहिती सादर केली जाते, त्यानुसार न्यायालय आपलं मत मांडतं. मुळात उच्च न्यायालयात सादर केलेली माहिती, आकडेवारी कधीची आहे? राज्य सरकारच्या आकडेवारीत विसंगती पाहायला मिळत आहे. सध्या पुणे शहराची परिस्थिती अत्यंत चांगली आहे, नियंत्रणात आहे. मागील 15 दिवसात पुण्याची आकडेवारी 16 हजारांनी घटली आहे. त्यामुळे पुण्यात कडक लाॅकडाऊनची गरज नाही, असं मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं आहे.
पुण्यात सकाळी 7 ते 11 पर्यंत अत्यावश्यक सेवा सुरु आहेत. मागील महिनाभरापासून पुण्यात लॉकडाऊनच आहे. या परिस्थितीत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी झाली, कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या जास्त आहे. यंत्रणा सुरु आहे. यापेक्षा कडक लॉकडाऊन काय असू शकतं? त्यामुळे सध्यातरी पुण्यात कडक लॉकडाऊनची आवश्यकता नाही, असं स्पष्ट मत मोहोळ यांनी मांडलं आहे.
दरम्यान, पुणे महापालिका न्यायालयात याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करुन वस्तुस्थिती न्यायालयासमोर मांडणार आहेे. वस्तुस्थिती वेगळी आणि न्यायालयासमोर सादर झालेली आकडेवारी वेगळी आहे, असं देखील महापौर मुरलीधर मोहोळ यांनी बोलुन दाखवलं.