#Covid-19: प्राणवायूनिर्मिती प्रकल्पांमुळे नंदुरबारला दिलासा
![# Covid-19: Relief to Nandurbar due to oxygen generation projects](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/04/OXIJAN-NEW.jpg)
मुंबई |
राज्यात सर्वत्र प्राणवायू कमतरतेची ओरड होत आहे. करोनाची लागण देशात सुरू झाल्यापासून अतिशय तोकडी आरोग्य यंत्रणा असलेल्या नंदुरबार जिल्ह्याने मात्र या संकटावर काही अंशी मात केली आहे. जिल्ह्यात हवेतून प्राणवायूनिर्मिती करणारे काही प्रकल्प असून त्यांच्याद्वारे शासकीय रुग्णालयांना आवश्यक असलेल्या प्राणवायूपैकी जवळपास ५० टक्के पूर्तता होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या नियोजनामुळे सध्या जिल्ह्यात ४०० मोठे सिलिंडर भरतील असे तीन हवेतूनच प्राणवायूनिर्मिती करणारे प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. त्यामुळे जिल्हा आपल्या मागणीच्या जवळपास ४० ते ५० टक्के प्राणवायूनिर्मिती ही स्वत:च करत आहे. सध्या जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालये आणि करोना कक्षांना जवळपास हजार ते १२०० मोठे सिलिंडर भरतील इतपत प्राणवायूची आवश्यकता आहे. त्यापैकी ४०० सिलिंडरइतक्या प्राणवायूची नंदुरबारमध्येच निर्मिती केली जात असून धुळे, औरंगाबाद या दोन शहरांतून उर्वरित प्राणवायूचा पुरवठा केला जात आहे. नंदुरबारमध्ये हवेतून प्राणवायू निर्माण करणारे दोन प्रकल्प हे जिल्हा सामान्य रुग्णालयात, तर एक प्रकल्प हा शहादा तालुक्यातील करोना केंद्रात सुरू करण्यात आला आहे.
सध्या जिल्ह्यात नंदुरबार शहरात २००, शहादा शहरात १००, नवापूर ८० तर तळोदा शहरात ५० याप्रमाणे ३७८ शासकीय प्राणवायूसज्ज खाटा आहेत. यापैकी शहादा आणि नंदुरबारची निकड या तीन प्रकल्पातून भागवली जाते. नवापूर आणि तळोद्यात अशाच पद्धतीने दोन प्रकल्पांचे काम प्रगतिपथावर असून येत्या आठवड्याभरात या ठिकाणी हवेतून प्राणवायूनिर्मितीचे दोन लहान प्रकल्प उभे राहतील. केवळ याच प्रकल्पांवर विसंबून न राहता जिल्हा प्रशासनाने लिंडल कंपनीसोबत करार करत द्रवरूप प्राणवायूनिर्मितीच्या विशाल प्रकल्पा उभारणीस सुरुवातदेखील केली आहे. पंधरा ते वीस दिवसांच्या आत हा प्रकल्पदेखील कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच नंदुरबार हा प्राणवायूनिर्मितीच्या बाबतीत मेच्या पहिल्याच पंधरवड्यात स्वयंपूर्ण होण्याची शक्यता आहे. शासकीय वगळता नंदुरबारमधल्या दोन खासगी रुग्णालयांमध्येदेखील हवेतून प्राणवायूनिर्मितीचे छोटेखानी प्रकल्प आहेत. त्यामुळेच नंदुरबारमध्ये शासकीय आणि अशासकीय असे दोन्ही मिळूून हवेतून प्राणवायूनिर्मितीचे सद्य:स्थितीत पाच प्रकल्प सुरू आहेत. विशेष म्हणजे हे सर्व करोनाची साथ सुरू झाल्यानंतर जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग यांच्या संयुक्त नियोजनाचा परिपाक असल्याने राज्य शासनाने नुकत्याच काढलेल्या एका परिपत्रकात नंदुरबारप्रमाणेच प्रत्येक जिल्ह्याने आपआपल्या जिल्ह्यात अशा पद्धतीने हवेतून प्राणवायूनिर्मितीचे प्रकल्प कार्यान्वित करण्याचे नमूद केले आहे. त्यामुळेच नंदुरबारचे प्राणवायूनिर्मिती प्रकल्प राज्यासाठी पथदर्शीच म्हणावे लागतील.
वाचा- #Covid-19: करोना रुग्णांच्या अंत्यसंस्कारावरून नगरमध्ये वाद