#Covid-19: करोना रुग्णांच्या अंत्यसंस्कारावरून नगरमध्ये वाद
नगर |
करोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावात, दुसऱ्या लाटेत मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. वाढलेल्या करोनाबळींवरील अंत्यसंस्काराचा प्रश्न नगर शहरात हळूहळू उग्र रूप धारण करू लागला आहे. अंत्यसंस्काराचा मोठा ताण नगर शहरातील सर्व जाती-धर्मांच्या स्मशानभूमींवर पडला आहे. त्यातून अंत्यसंस्कारासाठी दिवस दिवस प्रतीक्षा, विद्युत दाहिनीऐवजी एकाच सरणावर अनेक मृतदेहांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार, करोनाची भीती कमी झाल्याने अंत्यसंस्कारावेळी नातेवाईकांची उपस्थिती, अशा घटना वाढत आहेत. त्यामुळे स्मशानभूमीत अंत्यसंस्कारावेळी पोलीस बंदोबस्त तैनात करावा लागतो आहे. आता शहरातील मध्य वस्तीतील ‘अमरधाम’ स्मशानभूमीत जिल्ह्यातील अंत्यसंस्कारास विरोध होऊ लागला आहे. त्याला शहरातील राजकारणाचाही संसर्ग झाला आहे.वाढत्या संसर्गामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रुग्ण उपचारासाठी नगर शहराकडे धाव घेत आहेत. केंद्र सरकारने करोनाबळींवर कोणत्या बंधनात अंत्यसंस्कार करावेत, याचे नियम ठरवून दिले आहेत. त्यानुसार ज्या शहरात करोनाग्रस्ताचा मृत्यू झाला तेथेच त्याचा अंत्यविधी करणे बंधनकारक केले आहे.
करोनाच्या पहिल्या लाटेवेळी मृत्युमुखी पडलेल्या करोनाग्रस्ताचा मृतदेह अंत्यविधीसाठी नातेवाईकांच्या ताब्यात देण्याच्या, जरी तो ‘पीपीई किट’मध्ये गुंडाळून दिला तरी, खेड्यापाड्यातून, गावोगाव संसर्गाचा मोठा फैलाव होण्याच्या घटना घडल्या. काही ठिकाणी तर करोनाग्रस्त मृतदेहांना परंपरेनुसार अंघोळ घालण्याचे प्रकार घडले. हे टाळण्यासाठी नगर शहरातच अंत्यविधी सुरू करण्यात आले. शहराच्या नालेगाव भागात ‘अमरधाम’ मुख्य स्मशानभूमी आहे तर केडगाव व नागापूर उपनगरात अन्य स्मशानभूमी आहेत. मात्र विद्युतदाहिनीची व्यवस्था केवळ नालेगाव ‘अमरधाम’मध्येच आहे. या दोन विद्युतदाहिनींमध्ये दिवसभरात २० मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जातात. नगर शहरातील रहिवासी असलेल्या ५३४ जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून रुग्ण जसे उपचारासाठी नगर शहरात येण्याचे प्रमाण वाढले तसे वाढलेल्या मृत्यूंवरील अंत्यसंस्काराचा मोठा ताण शहरावर निर्माण झाला. सुरुवातीला केवळ नालेगाव ‘अमरधाम’मध्ये अंत्यसंस्कार केले जात होते. तेथे अंत्यसंस्कारासाठी ९ कर्मचारी कंत्राटी पद्धतीने नियुक्त केलेले आहेत. ते गेल्या तीन महिन्यांपासून उसंत न घेता, तक्रार न करता चोवीस तास काम करत आहेत.
- स्थानिकांचा विरोध
अमरधाम शहराच्या मध्यवस्तीत आहे. त्याच्या परिसरात सुमारे ३० ते ४० हजार लोकसंख्या आहे. विद्युतदाहिनी आणि सरण चोवीस तास सुरू राहिल्याने परिसरात धूर पसरतो. त्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे केडगाव व नागापूर येथील स्मशानभूमीचा पर्याय पुढे आला. परंतु काही दिवसांतच तेथील नागरिकांनी करोनाग्रस्तांवर तेथे अंत्यसंस्कार करण्यास विरोध सुरू केला. तीन दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी नगरमध्ये करोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. या बैठकीत काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष दीप चव्हाण व अन्य काही पदाधिकाऱ्यांनी नगर शहरात मृत्यू झालेल्या करोनाग्रस्तांचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी त्या त्या तालुक्यात पाठवला जावा, अशी मागणी केली. परंतु त्यातून संसर्ग फैलावण्याचा मोठा धोका लक्षात घेऊन अधिकाऱ्यांनी विरोध केला. याच बैठकीत काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस उबेद शेख यांनी मुस्लिमांच्या दफनभूमीची क्षमता संपल्याने नवी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी जागा शोधण्याचे आश्वासन दिले. दफनभूमीसाठी पर्यायी जागेचा शोधा अद्यापि लागलेला नाही.
दहनभूमीसाठी सावेडी उपनगरात बंद पडलेल्या कचरा डेपोच्या १५ एकर भूखंडाचा पर्याय आमदार संग्राम जगताप यांनी सुचवला. जगताप यांच्यासह जिल्हाधिकारी भोसले, महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी या जागेची पाहणी केली. भूखंडाला संरक्षण भिंतीचे कुंपण असल्यामुळे जागा सुरक्षित आहे. मात्र तेथे आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून त्याचा स्मशानभूमी म्हणून वापर करण्यास काही दिवसांचा अवधी लागणार आहे. आमदार जगताप यांनी ‘अमरधाम’ नागरी वस्तीत असल्यामुळे जिल्ह्यातील करोनाबळींवर तेथे अंत्यसंस्कार होऊ नयेत, केवळ नगर शहरातील करोनाबळींवर अंत्यसंस्कार केले जावेत, अन्य करोनाबळींचे मृतदेह अंत्यसंस्कारासाठी स्थानिक स्तरावर केले जावेत अशा मागणीचे पत्र जिल्हा प्रशासनाला दिले आहे. तर शिवसेनेने मृतदेह त्या त्या तालुक्यात पाठवण्यास विरोध करणारे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. केंद्र सरकारच्या नियमानुसार ज्या शहरात करोना रुग्णाचा मृत्यू होतो, तेथेच अंत्यसंस्कार करणे बंधनकारक आहे. जिल्हा क्षेत्रफळाने मोठा आहे. १४ तालुके आहेत. जर मृतदेह तेथे अंत्यसंस्कारासाठी पाठवले तर करोना संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढेल. ते धोकादायक ठरेल. आमदार संग्राम जगताप यांनीही ते मान्य केले आहे. त्यामुळे महापालिकेने स्मशानभूमीचा ठराव केलेल्या १५ एकर जागेच्या भूखंडावर अंत्यविधीची व्यवस्था लवकरच केली जाईल.
- – डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी, नगर
जिल्ह्यात कोठेही करोना रुग्णाचा मृत्यू झाला की त्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी पार्थिव नगर शहरातील स्मशानभूमीत आणले जाते. त्यामुळे स्मशानभूमीत मोठी गर्दी होते. तेथील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिक व लोकप्रतिनिधींनी करोनाग्रस्तावरील अंत्यविधी स्थानिक स्तरावर करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे शहराच्या स्मशानभूमीतील वर्दळ कमी होईल तसेच शहरातील अंत्यविधीसाठी लागणारा वेळही कमी होऊन लवकरात लवकर अंत्यसंस्कार होतील.
- – संग्राम जगताप, आमदार, नगर