पालकमंत्री साहेब, पुणेकरांना वाचवा; पुण्यात जागोजागी लागले फलक
पुणे |महाईन्यूज|
करोना बाधित रुग्णांची वाढ झपाट्याने होत असून पुण्यातील स्थिती गंभीर बनत चालली आहे. पुण्यात मृत्यूंचे प्रमाणही वाढताना दिसत आहे. यामुळे चिंतेत असलेल्या पुणेकर नागरिकांनी आता थेट पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मदतीचे आवाहन केले आहे. यासाठी पुणेकरांनी ठिकठिकाणी फलक लावले आहेत. पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीसह अनेक ठिकाणी हे फलक लावले आहेत. ‘मरण झालं स्वस्त, स्मशानभूमीत लागल्या रांगा. पालकमंत्री साहेब पुणेकरांना वाचवा- करोना पुणेकर.’, असा मजकूरही फलकांवर वाचायला मिळत आहे.
पुण्यात हे फलक ठिकठिकाणी कोणी लावले याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. फलकांवरील एकाच प्रकारचा मजकूर लिहिलेला नसून वेगवेगळ्या प्रकारचे मजकूर पाहायला मिळत आहेत. एका फलकावर लिहिले आहे, ‘करोनाग्रस्त पेशंटच्या बेडवर रेमडेसिव्हीर देणार होतात. कुठे आहेत? पालकमंत्रीसाहेब पुणेकरांना वाचवा’, असा मजकूरही लिहत पालकमंत्री अजित पवार यांना आवाहन करण्यात आले आहे.
पुणेकर करोनाग्रस्तांच्या मदतीसाठी पुणे जिल्हा परिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी धावून आले आहेत. परिषदेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारला एक दिवसाचे वेतन दिला आहे. या एका दिवसाच्या वेतनातून १ कोटी ९७ लाख रुपये गोळा झाले आहेत. या पैशातून ग्रामीण भागात सेवा देण्यात येणार आहे. या मदतीद्वारे ग्रामीण भागात देशातील सर्वोत्तम डॉक्टरांची सेवा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे.
तर, दुसरीकडे करोनाचा सामना करण्यासाठी पुणे महापालिकेने नवी नियमावली लागू केली आहे. याद्वारे करोना संसर्गावर नियंत्रण मिळवण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. यात महत्वाचे म्हणजे अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना करोना चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. खानावळींना पार्सल सेवा देण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मेस, मद्यविक्री आणि चष्म्याच्या दुकानांना अटींसह परवानगी देण्यात आली आहे. मद्यविक्री केवळ होम डिलिव्हरीच्या माध्यमातूनच करण्यात येणार आहे.