पावसाचे पाणी घरात शिरल्याने गांधीनगरमधील नागरिकांचा आयुक्तांच्या बंगल्यासमोर ठिय्या
पिंपरी – प्रभाग क्रमांक 9 गांधीनगर, खराळवाडी, व कामगारनगरमधील नाले, ड्रेनेज लाईन, स्टॉर्म वॉटर लाईनची पावसाळापूर्व साफसफाई केली नसल्यामुळे पहिल्याच पावसात या नलिका चोकअप होऊन दुर्गंधीयुक्त पाणी नागरिकांच्या घरात शिरले. त्यामुळे संतप्त नागरिकांनी आज रविवारी (दि. 24) आयुक्त श्रावण हार्डीकर यांच्या बंगल्यासमोर ठिय्या मांडला.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग 9 मधील गांधीनगर, खराळवाडी व कामगारनगर मधील लोकवस्तीतून वाहणारे नाले बांधकाम व्यवसायिकांनी बुजविले आहेत. त्यातच स्टॉर्म वॉटर लाईन, ड्रेनेज लाईनची पावसाळापूर्व सफाई पालिकेने केली नाही. त्यामुळे पहिल्या पावसात ड्रेनेज लाईन, स्टॉर्म वॉटर लाईन तुंबल्याने पाणी अक्षरशः नागरिकांच्या घरात शिरले. कामगारनगरमधील मशिदीमागचा नाला बांधकाम व्यावसायिकांनी बुजविला आहे. त्यामुळे मशिदीसह लागून असलेल्या झोपड्यांमध्ये मैलामिश्रीत पाणी शिरल्याने दुर्गंधी पसरली आहे.
पालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे ऐन पावसाळ्याच्या तोंडावर नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी आज सकाळी आयुक्त हार्डीकर यांच्या बंगल्यावर धडक दिली. बंगल्यासमोर नागरिकांनी ठिय्या मांडला. यावेळी माजी नगरसेवक कैलास कदम यांनी आयुक्त हर्डीकर यांना निवेदन दिले. नाल्यांची तातडीने साफसफाई करण्याचे आदेश संबंधित विभागांतील अधिका-यांना देण्यात यावेत, अशी मागणी कदम यांनी केली आहे.