शिवकुमार यांनी कॉंग्रेसला दिली 5 कोटींची बेहिशेबी रोकड
- प्राप्तिकर विभागाची तक्रार
बंगळूर – कर्नाटकमधील कॉंग्रेसचे वजनदार मंत्री डी.के.शिवकुमार यांच्या अडचणी वाढतच आहेत. आता प्राप्तिकर विभागाने शिवकुमार यांनी अखिल भारतीय कॉंग्रेस समितीला 5 कोटी रूपये इतकी बेहिशेबी रोकड दिल्याची तक्रार येथील विशेष न्यायालयात दाखल केली आहे.
कॉंग्रेस समितीच्या कार्यालयात 1 जानेवारी 2017 ला 3 कोटी रूपये पोहचवण्यात आले. त्यानंतर आठ दिवसांनी आणखी 2 कोटी रूपये देण्यात आले. शिवकुमार आणि इतर आरोपींच्या निर्देशावरून संबंधित रोकड पोहचवण्यात आल्याचे प्राप्तिकर विभागाच्या तक्रारीत म्हटले आहे. त्या तक्रारीत शिवकुमार यांच्याबरोबरच त्यांचे व्यावसायिक भागीदार सचिन नारायण आणि एका वाहतूक कंपनीचे मालक सुनीलकुमार शर्मा यांना आरोपी म्हणून दाखवण्यात आले आहे. इतर आरोपींच्या मदतीने शिवकुमार आणि शर्मा हे नियमितपणे हवाला माध्यमातूून मोठ्या प्रमाणात बेहिशेबी रकमेची आदानप्रदान करतात, असा दावा तक्रारीद्वारे करण्यात आला आहे.
शिवकुमार आणि इतर आरोपींवर करचुकवेगिरीचे कारस्थान रचल्याचा आरोपही ठेवण्यात आला आहे. मागील वर्षी ऑगस्टमध्ये दिल्ली आणि बंगळूरमध्ये टाकण्यात आलेल्या छाप्यांवेळी तब्बल 20 कोटी रूपयांची रोकड जप्त करण्यात आली होती. ती बेहिशेबी रक्कम शिवकुमार यांच्याशी संबंधित असल्याचे प्राप्तिकर विभागाने म्हटले होते. करचुकवेगिरी प्रकरणी न्यायालयाने नुकतेच शिवकुमार यांना चौथ्यांदा समन्स बजावले आहे.