पूजा चव्हाणच्या आजी आल्या आता गुन्हा दाखल करा; तृप्ती देसाई यांची मागणी
![Pooja Chavan's grandmother came, now file a case; Demand of Trupti Desai](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/02/trupti-desai-min.jpg)
पुणे – पूजा चव्हाणच्या नातेवाईकांनी तक्रार दाखल न केल्यामुळेच या प्रकरणात गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही, असं पुणे पोलिसांकडून सातत्याने सांगितलं जात आहे. त्यामुळे आता पूजाची आजी शांताबाई राठोड गुन्हा दाखल करण्यासाठी आल्या असून पोलिसांनी आता या प्रकरणी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भूमाता ब्रिगेडच्या नेत्या तृप्ती देसाई यांनी केली आहे.
तृप्ती देसाई या पूजाची चुलत आजी शांताबाई राठोड यांच्यासह पुण्यात दाखल झाल्या आहेत. पूजा चव्हाण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी त्या वानवडी पोलीस ठाण्यात येणार आहेत. त्यामुळे या ठिकाणी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलीस स्टेशनला जाण्यापूर्वी तृप्ती देसाई यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधताना हा सवाल केला. नातेवाईक येत नाहीत म्हणून गुन्हा दाखल होत नाही, असं पुणे पोलिसांचं म्हणणं होतं. आज शांताबाई आल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनी फिर्याद घ्यावी. जोपर्यंत तक्रार नोंदवून घेतली जात नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही, असा इशारा देसाई यांनी दिला.
पुरावे असताना राजीनामा का नाही?
अनेक पुरावे असतानाही वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यात आला नाही. महंताना विचारूनच राठोड राजीनामा घेणार असल्याचं कळतंय. हे सर्व करताना त्यांनी महंतांना विचारलं होतं का? असा सवाल करतानाच याप्रकरणात संबंधितांवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे. दोषी कोणीही असो त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं. पूजा चव्हाण प्रकरणातील ऑडिओ क्लिपच्या आधारेच ही कारवाई करण्यात यावी, या प्रकरणातील सर्व माहिती बाहेर आलीच पाहिजे, असंही त्या म्हणाल्या.
आवाज कुणाचा सर्वांनाच माहीत
त्या ऑडिओ क्लिपमध्ये विलास चव्हाण आणि अरुण राठोड यांचा आवाज आहे. ते कुणाशी बोलत आहेत हे सर्वांना माहीत आहेत. ते वेगळं सांगण्याची गरज नाही. मंत्री असो की आणखी कोणी असो गुन्हा दाखल झालाच पाहिजे, अशी मागणी शांताबाई राठोड यांनी केली आहे. गुन्हेगारांवर गुन्हे दाखल केल्याने समाजाची बदनामी होणार नाही. उलट समाजाची होणारी बदनामी थांबेल, असंही त्या म्हणाल्या.
फिर्यादीमध्ये संजय राठोड यांचे नाव घेणार
जोपर्यंत पूजाच्या मृत्यूबाबत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत पोलीस वानवडी पोलीस ठाण्यातून निघणार नाही, अशी भूमिका शांताबाई यांनी घेतली आहे. या फिर्यादीमध्ये त्या वनमंत्री संजय राठोड यांचेही नाव टाकणार आहेत. त्यामुळे संजय राठोड यांच्या अडचणींमध्ये आणखी भर पडणार आहे. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांच्या मदतीने त्या पोलिसांत तक्रार दाखल करतील.