पिंपरीतील ३ रिक्त जागांची पोटनिवडणुक एप्रिल मधे
![Pimprietil 3 Blank Jaganchi Potnivadnuk april madhe](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/02/nivdnuk-1.jpg)
– १२ मार्चपर्यंत मतदार केंद्रनिहाय मतदार याद्या करण्याचे आदेश
पिंपरी | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ३ रिक्त जागांसाठीची निवडणूक एप्रिल महिन्यात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. निवडणूक आयोगाकडून मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार एप्रिल महिन्यात ही पोटनिवडणूक होण्याची शक्यता असून १२ मार्चपर्यंत मतदार केंद्रनिहाय मतदार याद्या अंतिम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
करोनामुळे राष्ट्रवादीच्या दोन तर भाजपाच्या एका नगरसेवकाचे निधन झाले होते. प्रभाग क्रमांक एक चिखली येथून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक दत्ता साने हे निवडून आले होते. त्यांचे ४ जुलै रोजी करोनामुळे निधन झाले होते. तर प्रभाग क्रमांक १४ दत्तवाडी प्रभागातून विजयी झालेले राष्ट्रवादीचेच नगरसेवक जावेद शेख यांचेही करोनामुळे ३१ जुलै रोजी निधन झाले होते.
याशिवाय भाजपाचे प्रभाग क्रमांक चार दिघी बोपखेलमधून निवडून आलेले नगरसेवक लक्ष्मण उंडे यांचे २६ सप्टेंबर रोजी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे महापालिकेच्या तीन जागा रिक्त झाल्या होत्या. या रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. निवडणुकीपूर्वी मतदार याद्या अंतिम करण्याचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. या पोटनिवडणुकीसाठी विधानसभेची मतदार यादी वापरण्यात येणार आहे. मतदार याद्या अंतिम झाल्यानंतर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे.
१६ फेब्रुवारीपर्यंत प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करणे. १६ ते २३ फेब्रुवारी या कालावधीत हरकती व सूचना मागविणे. ३ मार्च रोजी प्रभागनिहाय अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करणे. ८ मार्च रोजी मतदान केंद्राची यादी प्रसिद्ध करणे. १२ मार्च रोजी अंतिम प्रभागनिहाय व मतदान केंद्रनिहाय मतदारयाद्या अधिप्रमाणित करून प्रसिद्ध करन्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.