यवतमाळमध्ये मुलांना पोलिओऐवजी सॅनिटायझर पाजल्याप्रकरणी दोघे निलंबित
यवतमाळ – महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार घडला. पोलिओ लसीकरण मोहिमेदरम्यान चिमुकल्यांना पोलिओच्या लसीऐवजी चक्क सॅनिटायझर पाजण्यात आल्याची संतपाजनक घटना येथे उघडकीस आली. याप्रकरणी आता दोन जणांना निलंबित करण्यात आले आहे. वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य सेविका निलंबित झाल्याचे समजते आहे. तसेच चौकशी समितीने एका अंगणवाडी सेविकेच्या निलंबनाचा प्रस्तावही वरिष्ठांना दिला आहे. दरम्यान, या प्रकरणी पूर्ण चौकशी करून जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
मुलांना सॅनिटायझर पाजण्याचा धक्कादायक प्रकार यवतमाळ जिल्ह्याच्या घाटंजी तालुक्यातील भांबोरा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कापसी (कोपरी) येथे घडला. पोलिओच्या लसीचे दोन थेंब एक ते पाच वर्ष या वयोगटातील मुलांना तोंडावाटे दिले जातात. मात्र घाटंजी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कापसी कोपरी येथे मुलांना पोलिओची लस देण्याऐवजी सॅनिटायझर पाजल्याचा धक्कादायक प्रकार घडला. सॅनिटायझर पोटात गेल्यावर मुलांना मळमळ व उलटीचा त्रास सुरू झाला. सतत उलट्या होऊ लागल्यामुळे मुलांची तब्येत खालावली. त्यामुळे मुलांचे पालक घाबरले, त्यांनी तातडीने वसंतराव नाईक मेडिकल कॉलेड अँड हॉस्पिटल येथे धाव घेतली. जवळपास बारा मुलांना तब्येत बिघडल्यामुळे याठिकाणी दाखल करण्यात आले.
दरम्यान, ज्यावेळी मुलांना लस देण्यात आली, त्यावेळी लसीकरण केंद्रावर समुदाय आरोग्य अधिकारी, आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका हे तिघे ण हजर होते, असे या बालकांच्या पालकांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. यावेळी गिरीश किसन गेडाम, योगीश्री किसन गेडाम, अंश पुरुषोत्तम मेश्राम, हर्ष पुरुषोत्तम मेश्राम, भावना बापूराव आरके, वेदांत नितेश मेश्राम, राधिका नितेश मेश्राम, प्राची सुधाकर मेश्राम, माही सुधाकर मेश्राम, तनुज राम गेडाम, निशा प्रकाश मेश्राम व आस्था प्रकाश मेश्राम या बालकांना पोलिओ लसीऐवजी सॅनिटायझर पाजण्यात आले.





