अभिमानास्पद! ‘नासा’च्या कार्यकारी प्रमुखपदी भारतीय वंशाची महिला
![Proud! A woman of Indian descent as the executive head of NASA](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/02/bhavya-lal-nasa.jpg)
वॉशिंग्टन – अमेरिकेतील अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’च्या कार्यकारी प्रमुख पदावर भारतीय वंशाच्या अमेरिकन महिलेला नियुक्त करण्यात आले आहे. भारतीय वंशाच्या भव्या लाल यांची अमेरिकेतील नासाच्या अंतराळ संस्थेचे कार्यवाहक म्हणून नियुक्त केले. भव्या यांची नियुक्ती ही भारतीयांसाठी मोठी अभिमानाची गोष्ट आहे.
व्हाइट हाऊसकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकामध्ये भव्या यांच्याबरोबरच नासामधील इतर प्रमुख पदांवरील नियुक्त्यांचीही घोषणा करण्यात आली आहे. अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन यांनी भव्या लाल यांचे नाव नासाच्या परिक्षण समितीच्या सदस्य म्हणून निवडले. यासंदर्भात नासानेही एक पत्रक जारी करत भव्या यांच्या नियुक्तीची अधिकृत घोषणा केली आहे. नासाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भव्य लाल यांना अभियांत्रिकी व अवकाश तंत्रज्ञानाचा चांगला अनुभव आहे. भव्या लाल नासाच्या इनोव्हेटिव्ह अॅडव्हान्स्ड कॉन्सेप्ट्स प्रोग्राम आणि नासा अॅडव्हायझरी कौन्सिलच्या तंत्रज्ञान, नाविन्य आणि अभियांत्रिकी सल्लागार समितीच्या बाह्य परिषदेच्या सदस्यदेखील राहिल्या आहेत.
भव्या यांनी अणु विज्ञानात बीएससी आणि एम एससी पदवी घेतली आहे. जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठातून सार्वजनिक धोरण आणि सार्वजनिक प्रशासनात त्या डॉक्टरेट आहेत. त्या अणु अभियांत्रिकी आणि सार्वजनिक धोरण ऑनर सोसायटीच्या सदस्य आहेत. दरम्यान, भव्या यांनी स्पेस टेक्नॉलॉजी क्षेत्रात मागील दीड दशकांहून अधिक काळ काम केले आहे. तसेच त्या इन्स्टीट्यूट ऑफ डिफेन्स अॅनालिसिस सायन्स अॅण्ड टेक्नोलॉजी पॉलिसी इन्स्टीट्यूटमध्ये (एसटीपीआय) रिसर्च स्टाफ म्हणून २००५ ते २०२० दरम्यान कार्यरत होत्या. एसटीपीआयमध्ये सहभागी होण्यापूर्वी त्या सी-सटीपीएस एलएलसीच्या अध्यक्षा राहिलेल्या आहेत. त्यापूर्वी भव्या यांनी केंब्रिजमधल्या मैसाचुसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान धोरण अभ्यास केंद्राचे संचालक पद भूषवले आहे. अमेरिकेच्या न्यूक्लिअर सोसायटीच्या अण्वस्त्रविषयक वार्षिक परिषदेच्या अध्यक्षस्थानीही भव्या यांची नियुक्ती करण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय अकॅडमी ऑफ अॅस्ट्रोनॉटिक्सच्या प्रतिनिधी म्हणूनही त्यांची निवड झाली होती. अंतराळ क्षेत्रातील संशोधनात भव्या यांनी मोठे योगदान दिले आहे. आता त्या नासामधील वरिष्ठ आर्थिक सल्लागार म्हणूनही काम पाहणार आहेत. कोणत्या अंतराळ मोहिमांसाठी किती खर्च करण्यात यावा याचसोबत इतर आर्थिक सल्ले देण्याची जबाबदारी आता भाव्या यांच्या खांद्यावर असणार आहे.