राज्यातील प्रत्येक मॉल, सिनेमागृहे, शोरुम्समध्ये शिवजयंती साजरी झाली पाहिजे
- भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा
- भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष तथा युवा वॉरियर्सचे प्रदेश संयोजक अनुप मोरे यांचे आवाहन
पिंपरी / महाईन्यूज
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती 19 फेब्रुवारी रोजी साजरी होत आहे. शिवाजी महाराज हे केवळ एका विशिष्ट समुदयाचे नसून महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीचे प्रेरणास्थान आहेत. त्यामुळे महाराजांचा जयंती उत्सव प्रत्येक ठिकाणी दिमाखात साजरा झाला पाहिजे. राज्याच्या कानाकोप-यातील मॉल असेल सिनेमागृहे असतील मोठमोठी हॉटेल्स अशा ठिकाणी महाराजांची जयंती साजरी झाली पाहिजे. एखाद्या ठिकाणी विरोध झालाच तर तो झुगारून जयंती साजरी केली जाईल. त्यासाठी राज्याच्या प्रत्येक भागातील भाजपा युवा मोर्चाच्या युवकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा युवा वॉरियर्सचे प्रदेश संयोजक अनुप मोरे यांनी केले आहे.
यासंदर्भात अनुप मोरे यांनी प्राथमिक स्थरावर पिंपरी-चिंचवडमधील रावेतच्या डी मार्टमध्ये महाराजांची जयंती साजरी करण्यासंदर्भात निवेदन दिले आहे. अशा स्वरुपाचे निवेदन देऊन राज्याच्या कानाकोप-यातील भाजयुमोच्या पदाधिका-यांनी महाराजांची जयंती साजरी करण्यास भाग पाडावे. छत्रपती शिवाजी महाराज हे तमाम भारतीयांचे प्रेरणास्त्रोत आहेत. त्यांनी संपूर्ण हिंदुस्थानला पछाडलेल्या मुगल साम्राज्याचा अस्त करून स्वराज्याची स्थापना केली. पुरोगामी विचाराची मुहूर्तमेड रोऊन रयतेचे राज्य निर्माण केले. प्रत्येक जाती धर्मातील व्यक्तीला प्रतिष्ठा आणि अधिकार त्यांनी बहाल केले. अशा महान राजांची जयंती महाराष्ट्रातील प्रमुख शहरासह उपनगरांमधील मॉल, सिनेमागृहे, फाईव्ह स्टार तसेच थ्री स्टार हॉटेल्समध्ये साजरी झाली पाहिजे. त्यामध्ये डी मार्ट, सेंट्रल मॉल, आयनॉक्स, फिनिक्स, थ्री स्टार व फाईव्ह स्टार हॉटेल्स, चारचाकी व दुचाकी वाहनांचे अलिशान शोरूम्स, मोठमोठ्या कंपन्या अशा आस्थापनांमध्ये महाराजांची जयंती साजरी झाली पाहिजे. त्यासाठी भाजप युवा मोर्चाने पुढाकार घेतला आहे, अशी माहिती मोरे यांनी दिली आहे.
विरोध झुगारून महाराजांची जयंती साजरी करणार – मोरे
आपल्या देशात सर्व जाती-धर्मातील सण उत्साहात साजरे केले जातात. डी मार्ट, सेंट्रल मॉल, आयनॉक्स, हॉटेल्स अशा ठिकाणी जाणा-या प्रत्येक नागरिकांच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांप्रती आदराची भावना असते. ज्या राजामुळे आपल्याला विचारांचे वैभव प्राप्त झाले त्याच राजांच्या जयंतीकडे दुर्लक्ष केल्यास भाजप युवा मोर्चा कदापी सहन करणार नाही. त्यामुळे एखाद्या ठिकाणी महाराजांची जयंती साजरी करण्यासाठी संबंधित व्यवस्थापनाकडून विरोध झाला तर तो झुगारून त्याठिकाणी भाजयुमोचे पदाधिकारी जयंती साजरी करतील. भाजपयुमोच्या प्रत्येक कार्यकर्त्याने ते रहात असलेल्या शहरातील अशा मॉल्स, हॉटेल्स, शॉरूम्समध्ये महाराजांची जयंती साजरी करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन अनुप मोरे यांनी केले आहे .





