पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली टोळी गजाआड
![पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली टोळी गजाआड](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/11/crime-700543_201911320679.jpg)
पिंपरी |महाईन्यूज|
पुण्यातील डांगे चौकाजवळील पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीच्या वाकड पोलिसांनी मुसक्या आवळल्या. रविवारी भरदुपारी पोलिसांनी ही धडक कारवाई केली. पोलिसांनी दरोडेखोरांच्या टोळीतील पाच जणांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डांगे चौकाजवळ असलेल्या पेट्रोल पंपावर काही जण दरोडा टाकणार असल्याची माहिती रविवारी दुपारी पोलिसांना मिळाली. दरोडेखोरांच्या टोळीतील काही जण त्या ठिकाणी थांबले होते. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला होता. त्याचवेळी काही जणांच्या हालचालींवर पोलिसांना संशय आला. त्यांनी पाच जणांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली. त्यांच्याकडे शस्त्रे, दोर, मिरची पुड आदी दरोड्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य सापडले. पोलिसांनी ते ताब्यात घेतले आहे.
तुषार भरोसे (वय २२), सिद्धार्थ भगत (२१), प्रेमशीतल जानराव (१९), श्रीपाद उर्फ ओंक्या मारूती कामत (१८) आणि स्वप्नील चंदनशिवे (२२) अशी अटक केलेल्या पाच जणांची नावे आहेत. त्यांची कसून चौकशी केली असता, त्यांनी कबुली दिली असून, वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत.