मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सीरम इन्स्टिट्यूटला भेट; पुनावाला यांच्यासोबत चर्चा
![Chief Minister Uddhav Thackeray's visit to Serum Institute; Discussion with Poonawala](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/Udhav-Thakare.jpg)
पुणे । प्रतिनिधी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिरम इन्स्टिट्यूटच्या घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खा. गिरीश बापट, आ. चेतन तुपे, सिरम इन्स्टिट्यूटचे आदर पुनावाला पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता उपस्थित होते.
कोरोना प्रतिबंधक लस ‘कोविशिल्ड’ची निर्मिती करणाऱया पुण्यातील सिरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाच्या मांजरी येथील एका इमारतीला भीषण आग लागली होती. या आगडोंबामध्ये 5 कंत्राटी कामगारांचा होरपळून मृत्यू झाला असून 9 जणांची सुखरूप सुटका करण्यात यश आले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीने प्रयत्न केले आणि दोन तासांत आग आटोक्यात आणली. सुदैवाने कोविशिल्ड लसनिर्मिती प्लांट पूर्णपणे सुरक्षित आहे. आग कशामुळे लागली याची सखोल चौकशी करण्यात येणार आहे.
दरम्यान, सिरममधील आगीबद्दल चिंता व्यक्त करतानाच या भीषण दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला ही अत्यंत दुःखद घटना आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला. पंतप्रधानांनी सिरमचे अदर पुनावाला यांनाही फोन करून दुर्घटनेची माहिती घेतली.या आगीचा कोणताही परिणाम कोविशिल्ड लस निर्मितीवर होणार नाही. कोविशिल्डचे उत्पादन सुरूच राहील, असे सिरम इन्स्टिटय़ूटचे सीईओ अदर पुनावाला यांनी सांगितले. एवढेच नव्हे तर मृतांच्या कुटुंबियांना 25 लाखांची मदतही त्यांनी जाहीर केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज दुपारी पुणे येथील हडपसर परिसरातल्या @SerumInstIndia च्या आग लागलेल्या इमारतीच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सिरम इन्स्टिट्यूटचे @adarpoonawalla यांच्याशी देखील चर्चा केली. pic.twitter.com/SQqdEoiRvX
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 22, 2021